Mumbai Local News: पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळादरम्यानची लोकल वाहतूक बंद
esakal October 19, 2024 12:45 PM

Mumbai Local Latest Update: मध्य रेल्वेने कर्नाक बंदर पुलाच्या पुनर्बांधणीसाठी सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (ता. १९) व रविवारी (ता. २०) मध्यरात्री तीन तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सीएसएमटीहून रात्री १२.१२ची कर्जत ही शेवटची लोकल सुटणार आहे, तसेच अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रविवारी मेन लाइनवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

कर्नाक बंदर ब्रीजच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवार व रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक मध्यरात्री १२.३० पासून ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत मेन लाइनवर भायखळा आणि सीएसएमटी, तसेच हार्बर लाइनवर वडाळा रोड आणि सीएसएमटीदरम्यान उपनगरी लोकल सेवा रद्द असणार आहे.

मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरी सेवा भायखळा स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील, तर हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरी सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत/पासून शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. दुसरीकडे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. २०) दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे आणि कल्याण दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : मध्यरात्री (शनिवार/रविवार) १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून रात्री ११.३०, ११.५१, १२.०२ आणि १२.१२ वाजता सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाही. तसेच कल्याणहून सकाळी ३.२३ आणि ३.५७ वाजता सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाही आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे : कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीकरीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून कुर्ला आणि पनवेल- वाशी या मार्गांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. तर ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

आजचे लोकलचे वेळापत्रक डाऊन मुख्य मार्ग -

शेवटची लोकल-सीएसएमटी ते कर्जत रात्री १२.१२ वाजता

पहिली लोकल सीएसएमटी ते खोपोली पहाटे ४.३५ वाजता

अप मुख्य मार्ग

शेवटची लोकल दिवा ते सीएसएमटी - रात्री १०.४८ वाजता

पहिली लोकल कर्जत ते सीएसएमटी पहाटे ३.२३ वाजता

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.