उर्से बाह्यमार्गातील प्रवेश बंदमधून वाहने घुसवण्याचे प्रकार सुरुच
esakal October 19, 2024 01:45 PM

सोमाटणे, ता. १८ ः सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असतानाही सोमाटणे, उर्से बाह्यमार्गातील प्रवेश बंदमधून वाहने घुसवण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून चाकण, तळेगाव, वडगावकडे व उर्से मार्गे पवनमावळात जाण्यासाठी जुना ऊर्से टोलनाका येथे प्रवेश मार्ग ठेवण्यात आला. तर सोमाटणे उड्डाणपुलाजवळून सोमाटणे मार्गे देहूरोड, पिंपरी-चिंचवड व परंदवडीमार्गे पवनमावळात जाण्यासाठी रस्ता बांधणीवेळी आत व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग ठेवण्यात आले होते. परंतु अनेक वाहनचालक टोल चुकवण्यासाठी उलट दिशेने प्रवेशबंदमधून वाहने घुसवण्याचे
प्रकार करत होते. यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडून खूप जणांना जीव गमवावा लागला होता. यावर कायमचा उपाय म्हणून रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उर्से, सोमाटणे येथे दोन्ही प्रवेश मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, प्रवेश बंदमधून वाहने घुसवल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईला पात्र होतील. या कारवाईमुळे प्रवेश बंदमधून वाहने घुसवण्याचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा महामार्ग पोलिस व रस्ते विकास महामंडळाला वाटत होती. परंतु ही अपेक्षा सध्या फोल ठरली आहे. दंडात्मक कारवाईला न घाबरता अनेक वाहनचालक वाहने घुसविण्याचा प्रकार करतात. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

‘‘प्रवेश बंदमधून वाहन घुसवल्यास वाहनाची प्रतिमा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन ही माहिती आरटीओकडे जात असल्याने अशा वाहनास, वाहन प्रकारानुसार पाचशे ते दोन हजार रुपये दंडाची रक्कम भरावी लागणार. हा दंड टाळण्यासाठी वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये.
- आर. एल. भालचिमे, पोलिस उपनिरीक्षक

PNE24U56358

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.