दक्षिण नागपूरच्या जागेवरून मविआत खडाजंगी! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा सामुहिक राजीनाम्यांचा इशारा, उद्धव ठाकरेंनाही विनंती
रजत वशिष्ठ, एबीपी माझा October 19, 2024 04:13 PM

Nagpur Vidhan Sabha Election 2024:  दक्षिण नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघात काँग्रेस गल्लोगल्ली, घरोघरी पोहोचलेला पक्ष आहे. तर शिवसेनेचा इथे संघटन सुद्धा नाही. त्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसलाच मिळायला हवा, अन्यथा काँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देतील आणि शिवसेनेच्या उमेदवारासाठी आम्ही बूथ सुद्धा लावणार नाही, मग त्यांनी मत घेऊन दाखवावे, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi)जागावाटप्याच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. 

उद्धव ठाकरेंनी ही स्थिती ओळखावी, पदाधिकार्‍यांची विनंती

दरम्यान, ज्या दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप्याच्या चर्चेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रस्सीखेच सुरू आहे, दक्षिण नागपूर चे काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि संजय राऊत यांच्यावर प्रचंड नाराज दिसत आहे. ज्या उमेदवारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दक्षिण नागपूर मतदार संघ मागत आहे, त्या प्रमोद मानमोडे यांना मागील निवडणुकीत चार हजार मतं मिळाले होते. त्यांना त्यांचेच कर्मचारी मत देत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही स्थिती ओळखावी, अशी विनंती ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आमचा आमच्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास असून नाना पटोले दक्षिण नागपूर मतदार संघ काँग्रेससाठी खेचून आणतील, असा विश्वासही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी तोडगा कसा काढणार?

राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी  यांच्यातील जागावाटपाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करून सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. असे असतानाच विदर्भातील दोन जागांवर शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष अडून बसलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नागपुरातील दोन मतदारसंघ जागावाटपाच्या मतभेदाच केंद्रबिंदू ठरत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील जागावाटपात दक्षिण नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ या दोन जागांवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. नागपूर शहरातील सहापैकी एक आणि ग्रामीण भागातील सहापैकी एक अशा दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हव्या आहेत. रामटेक या मतदारसंघातून शिवसेना पक्ष निवडणूक लढलेला आहे. त्यामुळे यावेळीदेखील या जागेवरून आम्हीच निवडणूक लढवणार असा दावा ठाकरे यांच्या पक्षाने केली आहे. 

हे ही वाचा 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.