Diwali Muhurat Trading 2024: या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग कधी असणार, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर; काय आहे महत्त्व?
esakal October 19, 2024 07:45 PM

Diwali Muhurat Trading 2024: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये दरवर्षी दिवाळीत मुहूर्तावर व्यवहार केला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी ग्रहांच्या स्थितीनुसार निवडलेल्या वेळेला मुहूर्त म्हणतात. बीएसई आणि एनएसई हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळीपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करतात.

याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. असे मानले जाते की यामुळे सौभाग्य प्राप्त होते. यंदा शेअर बाजारात वार्षिक मुहूर्त खरेदीची तयारी सुरू झाली आहे.

समृद्धी आणि संपत्ती टिकून राहावी म्हणून मुहूर्तावर लक्ष्मीपूजनही केले जाते. या कालावधीत गुंतवणूकदार व्यापाराद्वारे संवत 2081 सुरू करतील. अद्याप या संदर्भात BSE आणि NSE कडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुहूर्ताचा व्यवहार यंदा 1 नोव्हेंबरला होणार आहे. या संदर्भात BSE आणि NSE नंतर स्वतंत्र माहिती देतील.

बीएसईच्या वेबसाइटनुसार, या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याच्या वेळेबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. जे इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सत्र संपण्याच्या 15 मिनिटे आधी सर्व पोझिशन्स सेटल केले जातील. त्यानुसार त्यांना त्यांच्या व्यापाराचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल.

भारतातील स्टॉक ब्रोकर्स दिवाळी ही नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. अनेक गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स खरेदी केल्याने येत्या वर्षात समृद्धी आणि प्रगती होते.

या काळात ते आपला पोर्टफोलिओही सांभाळत नवीन खाती सेटल करतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर ब्रोकर्स त्यात सक्रिय सहभाग घेतात. लहान गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवले पाहिजे की या काळात शेअर बाजारात झपाट्याने चढ-उतार होतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.