दौंड तालुक्यात दरवळतेय भात पिकाचा सुगंध
esakal October 19, 2024 07:45 PM

खुटबाव, ता. १९ : एकेकाळी उसाची मक्तेदारी असणाऱ्या दौंड तालुक्यामध्ये दोन वर्षांपूर्वी भातपीक औषधाला सापडत नव्हते. मात्र, आज तालुक्यामध्ये भातापिकाने १०१ हेक्टरी पार करत उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात प्रथमच भाताचा सुगंध दरवळत आहे. अलीकडील काळामध्ये शेतकऱ्यांनी गहू ,ज्वारी, बाजरी व उसाव्यतिरिक्त कांदा , डाळिंब ,कापूस, भात, फळबागा, भाजीपाला घेण्यास सुरुवात केली आहे.

दौंड तालुक्यात भीमा व मुळा मुठा नदीच्या पात्रामुळे व खडकवासल्याच्या बेबी कालव्यामुळे दरवर्षी उच्चांकी ५० लाख टन उसाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र कमी कालावधीचे असणारे हे भात हे पीक पाझर जमिनीसाठी पोषक ठरत आहे. तालुक्यामध्ये पाण्याच्या अतिवापरामुळे ५०० हेक्टर जमीन ही नापिक होत झाली आहे. यावर उपाय म्हणून भात पीक पश्चिम भागातील काही शेतकरी घेत आहेत. यामध्ये इंद्रायणी, आंबेमोहोर, बासमती व कोलम या जातीचे भातपीक लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.

यामुळे भात पिकांना पसंती
* केवळ ६ महिन्यांचे असणारे हे पीक वाढते ४ फुटांपर्यंत
* कमी कालावधीत मिळते एकरी १५ ते ३० क्विंटल उत्पादन
* भाताच्या प्रकारानुसार मिळतो प्रतिकिलो ७० ते १०० रुपये बाजारभाव
* काही शेतकऱ्यांना गेल्यावर्षी मिळाले एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न


भात शेतीमुळे ऊस पिकासाठी बेवड तयार होत असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी हे पीक घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. तालुक्यामध्ये पारगाव, मलठण, नानगाव, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, देऊळगाव राजे या गावांमध्ये अधिकाधिक भात पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
-राहुल माने, तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी


माझ्या दीड एकर शेतीमध्ये पाणी साचायचे. त्यामुळे मी भात पीक निवडण्याचा निर्णय घेतला. बासमती व इंद्रायणी प्रकारचा तांदूळ लावला आहे. दीड एकरामध्ये २० क्विंटल उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. माझ्याशिवाय पारगाव मध्ये दत्तात्रेय शितोळे यांनी भातशेतीचा प्रयोग केला आहे. नवीन प्रयोग असल्याने आमच्या भागातील अनेक शेतकरी भेट देण्यासाठी येत आहेत.
- सुधीर ताकवणे, पारगाव,

तीन वर्षांतील भात लागवड -(हेक्टरमध्ये)
२०२१-२२.........००
२०२२-२३.........३०
२०२३-२४ .........१०१

मंडलनुसार आकडेवारी
देऊळगाव राजे मंडल......९९ हेक्टर
मलठण मंडल.....१ हेक्टर
पारगाव मंडल.....१ हेक्टर

01689

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.