GST Tax : बनावट कागदपत्रांद्वारे ५६१ कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; हैद्राबादमधील एकास अटक
esakal October 20, 2024 04:45 AM

पुणे - बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून ५६१ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महम्मद रियाझउद्दीन (रा. हैदराबाद, तेलंगण) याला अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे साथीदार अब्दुल सलाम ऊर्फ सलीम, नैशाब मलिक नौशाद, सलमान मलिक, शादाब, तन्वीर, ओॲसिस, राजू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जीएसटी कार्यालयातील अधिकारी रवी भूषणप्रसादसिंग कुमार (वय-३४) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करणे, फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.

जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात एन. एल. ट्रेडर्स या खात्याची ऑनलाइन तपासणी केली. तेव्हा काही व्यवहार संशयास्पद आढळून आले. त्यानंतर जीएसटी कार्यालयातील पथकाने चौकशी सुरु केली. नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात एका भंगार साहित्य खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे चौकशी केली.

त्यांच्याकडे जीएसटी कर भरणा पावत्यांबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा हैदराबाद येथील एस. बी. ट्रेडिंग कंपनीचे सलीम भाई यांनी पावत्या दिल्याची माहिती त्याने दिली. कर पावत्यांबाबत संशय आल्याने याबाबतची माहिती हैदराबाद येथील जीएसटी कार्यालयाला कळविण्यात आली. हैदराबाद येथील पथकाने चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारची कंपनी तेथे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.

५८ कंपन्यांसाठी कर भरणा पावत्या तयार केल्या -

आरोपी रियाजउद्दीनला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने ५८ कंपन्यांसाठी कर भरणा पावत्या तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी अब्दुल सलाम ऊर्फ सलीम, नैशाब मलिक नौशाद, सलमान मलिक, शादाब, तन्वीर, ओॲसिस, राजू यादव यांची नावे निष्पन्न झाले.

करचुकवेगिरी, तसेच कर भरण्याबाबतच्या बनावट पावत्या तयार करण्यासाठी आरोपींनी पैसे दिल्याची माहिती रिजाजउद्दीने जीएसटी पथकाला दिली. रिजाजउद्दीनला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संपतराव राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रियाजउद्दीनला न्यायालयीन कोठडी -

आरोपी महम्मद रियाजउद्दीनला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. त्याच्याकडून दोन लॅपटॉप, चार मोबाईल, पेनड्राइव्ह, तसेच बनावट पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.