बहराइच : मिरवणुकीदरम्यान हिंसाचार, तरुणाची हत्या आणि एन्काऊंटर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
BBC Marathi October 20, 2024 04:45 AM
BBC 13 ऑक्टोबरला बहराइचमध्ये झालेल्या संघर्षात राम गोपाल मिश्रा नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये काही दिवसांपूर्वी देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाला होता. त्यात राम गोपाल मिश्रा नावाच्या एका तरुणाची गोळी घालून हत्या झाली होती. या प्रकरणी आता एक नवं वळण मिळालं आहे.

बहराइच पोलिसांच्या दाव्यानुसार, राम गोपाल मिश्रा हत्याकांडात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघांना चकमकीदरम्यान गोळी लागली आहे.

या चकमकीबाबत अनेक विरोधी पक्षांबरोबरच आरोपींचे नातेवाईकही अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी मात्र यावर मौन बाळगून आहेत.

बहराइचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांच्या दाव्यानुसार, राम गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील पाच आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली होती.

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, पोलीस आरोपींना घेऊन हत्येसाठी वापरण्यता आलेलं शस्त्रं जप्त करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्याठिकाणी त्यांनी तिथं लपवलेली शस्त्रं काढून पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

अधीक्षकांच्या मते, पोलिसांनी स्वसंरक्षणात केलेल्या कारवाईत दोन जण जखमी झाले. त्यांत्या पायाला गोळी लागली आहे. पाच आरोपींपैकी गोळी लागलेल्या दोघांची नावं सरफराज आणि तालीब आहेत.

शुक्रवारी बहराइच पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

BBC

BBC हिंसा झाली त्यादिवशी नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये महराजगंज इथं 13 ऑक्टोबरला देवीच्या मूर्तीच्या विसर्जनादरम्यान हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात राम गोपाल मिश्रा नावाच्या तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर अनेक मुस्लिमांची घरं आणि दुकानं जाळण्यात आली.

विसर्जनादरम्यान डीजेवर चिथावणीखोर गाणी लावल्यानं हा वाद सुरू झाल्याचा आरोप आहे. मुस्लीम समुदायानं त्यावर आक्षेप घेतला होता.

BBC संघर्षानंतर अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली.

दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी जेव्हा डीजे बंद करण्यास नकार दिला तेव्हा मुस्लिम समुदायानं डीजेची वायर काढली. त्यावरूनच हा वाद वाढला होता, असं घटनेच्या दिवशी उपस्थित असलेल्या पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर उपस्थित गर्दीनं गोंधळ घालायला सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर विसर्जन मिरवणुकीत उपस्थित असलेले राम गोपाल मिश्रा आक्षेप घेणाऱ्या सरफराजच्या घरावर चढले आणि हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा फडकावू लागले.

या घटनेचा व्हीडिओही व्हायरल झाला. या व्हीडिओमध्ये राम गोपाल मिश्रा हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा फडकावताना दिसत आहेत.

त्याचवेळी घरातून गोळी झाडण्यात आली आणि त्यात राम गोपाल मिश्रा यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचे म्हणणे काय?

पोलिसांनी चकमकीबाबत केलेल्या दाव्यानुसार या घटनेत वापर करण्यात आलेली शस्त्रं जप्त करण्यासाठी सरफराज उर्फ रिंकू, मोहम्मद तालीब उर्फ शबलू यांना घेऊन पोलीस पथक कुर्मीपुरवा बायपासकडून जाणाऱ्या कालव्याला लागून 400 मीटर आतपर्यंत गेले होते.

त्याचवेळी दोन आरोपी पोलिसांना धक्का देऊन झुडपांमध्ये लपले. त्याठिकाणी लपवलेली जी शस्त्रं जप्त करण्यासाठी पोलिसांनी त्यांना आणलं होतं, तीच शस्त्रं घेऊन त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

बहराइचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला म्हणाल्या की, पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी करण्यात आलेल्या कारवाईत, एक आरोपी सरफराजच्या डाव्या पायावर आणि दुसरा आरोपी मोहम्मद तालीबच्या उजव्या पायाला गोळी लागली.

BBC गस्त घालताना पीएसी 32 बटालियनसाठीचे कमांडेंट अजय कुमार.

जखमी आरोपींना सीएचसी नानपारा याठिकाणी आणण्यात आलं. तिथून त्यांना बहराइचच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं.

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींनी वापरलेले 12 बोर एसबीएल गन, एक 12 बोर जीवंत काडतूस आणि खोखा काडतूसही जप्त केल्याचा दावा केला आहे.

एसपी वृंदा शुक्ला म्हणाल्या की, महराजगंजमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर एकूण 14 एफआयआर दाखल झाले आहेत. त्यात एकूण 57 जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये 34 मुस्लीम समुदायाचे तर 23 हिंदू समुदायाचे आहेत. त्यात बहुतांश जणांना हिंसाचार आणि दंगल प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आरोपीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांचं म्हणणं काय?

जखमींपैकी एक आरोपी सरफराजची बहीण रुख्सार यांनी बुधवारी एक व्हीडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी भावाचं एन्काऊंटर होणार असल्याची शंका व्यक्त केली होती.

14 ऑक्टोबरला त्यांचे पती आणि दीर यांना बहराइच पोलीस शहरातील त्यांच्या घरातून घेऊन गेले होते. पण आता त्यांचा काहीही पत्ता नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

रुख्सार यांचे वडील अब्दुल हमीदही या प्रकरणात आरोपी आहेत. रुख्सार यांनी केलेला दावा हा पोलिसांच्या माहितीच्या अगदी उलट आहे.

रुख्सार यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांचे वडील आणि भाऊ सरेंडर करायला जात होते, तेव्हाच पोलिसांनी त्यांना महराजगंजमध्ये अटक केली होती.

रुख्सार यांच्या मते, त्यावेळी झालेल्या गोंधळानंतर कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

रुख्सार महराजगंजपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहराइचमध्ये राहतात.

त्यांच्या मते, 14 ऑक्टोबरला पोलीस त्यांचे पती आणि दीर यांनाही सोबत घेऊन गेले. पण आता ते कुठेही सापडत नाहीयेत.

बुधवारी केलेल्या एका वक्तव्यात रुख्सार यांनी पोलीस त्यांच्या कुटुंबीयांचंही एन्काऊंटर करू शकतात अशी शंका व्यक्त केली होती.

तर आरोपींचे वकील मोहम्मद कलीम हाशमी यांनी ही चकमकच बनावट असल्याचा आरोप केला आहे.

प्राथमिकदृष्ट्या हे धार्मिक भेदभावामुळं केलं असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. या प्रकरणाची चौकशी सीबी-सीआयडी द्वारे करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

BBC सरफराज यांची बहीण रुख्सार

महराजगंजमधील काही जणांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हटलं की, बंदूक लपवण्यासाठी एवढ्या लांब जाण्याची काय करत होती. कारण जवळच नदी आणि झुडपं असलेला परिसर आहे.

रविवारच्या घटनेनंतर लोक घरी परतू लागले आहेत, पण घराबाहेर पडायला मात्र लोक अजूनही धजत नाहीत.

बीबीसीच्या टीमनं शुक्रवारी अनेक घरांची दारं ठोठावली पण काही मोजके लोकच बाहेर आले. घटनेच्या दिवशी डीजेवरूनच प्रकरण पेटलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

गावातील बबलू यांच्या मते, अब्दुल हमीद जसगड समुदायाचे असून ते सोनाराचं काम करतात. अनेक दशकांपासून त्यांचं सराफाचं काम आहे. त्यांची मुलं आणि भाऊदेखील हेच काम करतात.

बबलू यांच्या मते, हमीद किंवा त्यांचे कुटुंबीय कुणाशी भांडल्याचं त्यांनी आजवर कधीही ऐकलं नाही.

BBC

महराजगंजमधलेच रहिवासी असलेले सिराज यांच्या मते, त्यांनीही हमीदच्या कुटुंबीयांनी कुणाशी भांडण केल्याचं कधी ऐकलेलं नाही. लग्न किंवा इतर कार्यक्रमांसाठी उधारीवर सोनं देत ते हिंदू-मुस्लीम सर्वांना मदतही करायचे. लोक नंतर हळू-हळू त्यांचे पैसे परत करायचे.

सिराज यांच्या मते, हिंसाचारादरम्यान हमीद यांचं सोन्याचं दुकानही लूटण्यात आलं. बीबीसीनं तिथं जाऊन पाहिलं तेव्हा, त्याठिकाणची तिजोरी आणि इतर साहित्य रस्त्यावर पडलेलं होतं.

शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागानं हमीद यांच्या घरावर नोटीसही चिटकवली आहे. त्यांचं घर रस्त्यावर बांधलेलं असल्याचं, नोटीसमध्ये म्हटलं आहे.

हमीद यांच्या नातेवाईकांच्या मते, पोलिसांनी अज्ञात लोकांवर अनेक एफआयआर दाखल केलेले आहेत. त्यामुळं परिसरातील लोकांमध्ये पोलिस कधीही कोणालाही पकडू शकतात, अशी दहशत पसरलेली आहे.

महराजगंजमध्ये बीबीसीला असेही काही लोक भेटले ज्यांचे पोलिस अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत, पण त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलेलं नाही.

इमामगंजमध्ये राहणारे मेराज कुरैशी महराजगंजला आले होते. पण त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. आता त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत आहे.

मृताच्या नातेवाईकांचं म्हणणं काय?

महराजगंजमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं मृत राम गोपाल मिश्रा यांच्या गावचे रेहुआ मन्सूरपूरमध्येही लोक चांगलेच नाराज असल्याचं समोर आलं.

याठिकाणच्या अनेक लोकांनी बीबीसीच्या टीमशी बोलताना हा न्याय नसल्याचं म्हटलं.

राम गोपाल यांच्या पत्नी रोली मिश्रा म्हणाल्या की, त्यांच्या पतीला ज्या पद्धतीनं मारण्यात आलं त्यासमोर हे म्हणजे काहीच नाही.

रोली मिश्रा म्हणाल्या की, "हा न्याय नाही. सरकारनं हवं तर दिलेले पैसे परत घ्यावे. पण आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी."

मृत राम गोपाल मिश्राच्या बहीण, आई आणि वडीलही सरकारवर नाराज असल्याचं दिसलं. पोलीस मुद्दाम आरोपींच्या विरोधात कठोर भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांची बहीण प्रीती मिश्रा यांनी केला.

BBC बहराइच

गावचे माजी प्रमुख (प्रधान) माधवदीन मिश्रा यांच्या मते, त्यांच्या (सरफराज)बहिणीने त्यांच्या घरून तीन दिवसांपूर्वी लोकांना घेऊन गेल्याचा व्हीडिओ केला आहे. त्यामुळं लोकांच्या मनात संशय आहे. लोक पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाहीत.

माधवदीन यांच्या मते, हमीदला त्यांच्या गावातील लोक ओळखत होते. कारण त्यांच्या गावातील लोकांचं महराजगंज येणं-जाणं सुरू असायचं.

माधवदीन म्हणाले की, राम गोपाल मिश्रा केटरिंगचं काम करायचे. घटनेच्या दिवशी विसर्जनासाठी ते गावातून अडीच वाजता निघाले होते. त्यादिवशी डीजेवरूनच वाद वाढला होता, असं ते म्हणाले. डीजेवर धार्मिक गाणं वाजत होतं, असंही ते म्हणाले.

राजकीय पक्षांनी उपस्थित केले 'हे' प्रश्न

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोलीस मुद्दाम त्यांचं अपयश लपवण्यासाठी एन्काऊंटर करत असल्याचा आरोप अनेकदा केला आहे.

या एन्काऊंटरवर अखिलेश यादव म्हणाले की, "हे ठरवून करण्यात आलेलं आहे. हे एन्काऊंटर नाही तर हत्या होत आहे. सगळे लोक हे पाहत आहेत."

एआयएमआयएमचे अध्यक्ष असद्ददुदीन ओवेसी म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारनं 'रूल बाय गन'द्वारे नव्हे तर संविधानानुसार काम करावं. हा चुकीचा आदर्श घालून दिला जात आहे. ओवेसी म्हणाले की, सरकारनं सूडाचं राजकारण बंद करायला हवं.

Getty Images अखिलेश यादव

एवढ्या अचूकपणे पायावर निशाणा लावणाऱ्या पोलिसांना ऑलिंपिकमध्ये पाठवायला हवं, असंही ओवेसी म्हणाले.

या चकमकीबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर बड्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगलं आहे. बीबीसीनं बहराइचमध्ये असलेल्या गोरखपूर झोनच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एस. प्रताप कुमार यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले की, या प्रकरणात योग्य वेळी योग्य माहिती दिली जाईल.

बहराइचच्या एसपी वृंदा शुक्ला यांच्याशीही बीबीसीनं संपर्क साधला. सध्या या मुद्द्यावर काहीही बोलणार नसल्याचं त्या म्हणाल्या. इतर प्रकरणांतही क्रिमिनल जस्टिस सिस्टिमनुसार पोलीस पुढची कारवाई करतील, असंही त्यांनी म्हटलं.

भाजपची भूमिका काय?

या प्रकरणात विरोधकांच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह अखिलेश यादवबाबत बोलताना म्हणाले की, "बहराइचमध्ये झालेल्या घटनेवर अखिलेश यादव एकही शब्द बोलले नाहीत. त्यांचं कारण फक्त मुस्लीम मतं आहेत. त्यांचा डीएनएच हिंदू विरोधी आहे."

सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि युपी सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी एन्काऊंटरसाठी पोलिसांचं कौतुक केलं आहे.

BBC गिरिराज सिंह

ते म्हणाले की, "कोणी पोलिसांवर गोळ्या चालवत असेल तर पोलीस त्यांना फुलांचे हार घालतील का? की फुलांचा वर्षाव करतील? पोलीस कायम गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना अटक करण्यासाठीच जातात. पण त्यांनी काही केलं तर पोलिसही फायरिंग करतात."

तर भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, "अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना अशा प्रकारे धडा शिकवणं समाजाच्या भल्यासाठीच आहे."

योगी सरकारमधील एन्काऊंटर

उत्तर प्रदेशात 2017 पासून भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आहे.

पोलिसांच्या मते, युपीमध्ये मार्च 2017 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत सुमारे 12 हजार 964 पोलीस एन्काऊंटर झाले आहेत. त्यात 207 जणांचा मृत्यू झाला आहे.

यात 27 हजार 117 गुन्हेगार पकडले गेले आहेत. तर 6 हजार लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान 1601 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर 17 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात बिकरू कांडात मारल्या गेलेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

BBC बहराइच

गेल्या महिन्यात सुल्तानपूरमध्ये मंगेश यादव यांचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर युपी पोलिसांच्या एसटीएफवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं होतं.

एसटीएफच्या मते, भाजपच्या साडे सात वर्षांच्या कार्यकाळात या दलानं 49 जणांचं एन्काऊंटर केलं आहे. स्थानिक पोलिसांचे आकडे जोडले तर हा आकडा आणखी वाढू शकतो.

एसटीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांच्या मते, गेल्या साते सात वर्षांमध्ये एसटीएफनं 7 हजार गुन्हेगार पकडले आहेत. त्यापैकी 49 जणांचा चकमकीत मृत्यू झाला आहे. या गुन्हेगारांवर 10 हजार ते 5 लाखांपर्यंतच बक्षीस जाहीर झालेलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.