Lionel Messi: मेस्सी पुढील वर्षी क्लब विश्वकरंडकात खेळणार, इंटर मायामी संघ करणार अमेरिकेचे प्रतिनिधित्व
esakal October 21, 2024 02:45 PM

Latest Football News: पुढील वर्षी होणाऱ्या क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इंटर मायामी संघ खेळणार असल्याचे फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी शनिवारी रात्री जाहीर केल्यामुळे सुपरस्टार लिओनेल मेस्सी याचा या प्रमुख स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेचा फायदा स्पर्धेलाही होणार असल्याचे मानले जाते.

क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी होते. त्यात फिफाच्या सहा फुटबॉल महासंघांच्या ३२ संघांचा समावेश असतो. इंटर मायामी संघाचा सलमाची सामना १५ जून २०२५ रोजी मायामा गार्डन्स येथील हार्ड रॉक स्टेडियमवर खेळला जाईल.

अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना यजमान क्लब या नात्याने नव्या फिफा क्लब विश्वकरंडक २०२५ मध्ये सहभागी होण्यास जगातील सर्वोत्तम क्लबपैकी एक असलेला इंटर मायामीच्या सहभागाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे, असे इन्फँटिनो यांनी नमूद केले. अमेरिकेतील सध्याच्या मेजर लीग सॉकर स्पर्धेत इंटर मायामीने सर्वाधिक गुणांची नोंद केली आहे. त्यासंदर्भात मैदानावरील कार्यक्रमात इन्फँटिनो बोलत होते. गतवर्षीपासून मेस्सी इंटर मायामी संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

पुढील वर्षी १३ जुलैपर्यंत क्लब विश्वकरंडक स्पर्धा चालणार आहे. अंतिम सामना न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला जाईल. याच मैदानावर २०२६ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत नियोजित आहे. अमेरिकेत होणाऱ्या क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला आतापर्यंत प्रमुख पुरस्कर्ता मिळालेला नाही, तसेच प्रसिद्धीमाध्यम हक्कही वितरित झालेले नाहीत. अमेरिकेत होणाऱ्या क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील इतर सामने अटलांटा, सिनसिनाटी, नॅशव्हिल, चार्लोट, ओर्लांडो, लॉस एंजेलिस, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन व सीटल येथे खेळले जातील.

युरोपातील सर्वाधिक १२ संघ

क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत युरोपातील सर्वाधिक १२ संघांचा समावेश आहे. यामध्ये ॲटलेटिको माद्रिद, बायर्न म्युनिक, बेन्फिका, बोरुसिया डॉर्टमंड, चेल्सी, इंटर मिलान, युव्हेंट्स, मँचेस्टर सिटी, पॅरिस सेंट जर्मेन, पोर्तो, रेयाल माद्रिद व साल्झबर्ग या क्लबचा समावेश आहे.

स्पर्धेतील इतर संघ


याव्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील बोका ज्युनियर्स, फ्लेमेंगो, फ्लुमिनेन्ज, पाल्मेरास व रिव्हर प्लेट, उत्तर अमेरिकेतील लिऑन, माँतेरे, पाचुका, सीटल साऊंडर्स, आफ्रिकेतील अल अहली, एस्पेरॅन्स, मामेलोदी सनडाऊन्स, वायदाद, आशियातील अल हिलाल, अल अईन, उल्सान, उरावा, ओसेनिया विभागातील ऑकलंड सिटी हे संघ पात्र ठरले आहेत. इंटर मायामी स्पर्धेतील ३१वा संघ आहे. अखेरचा संघ ३० नोव्हेंबर रोजी ब्युनॉस आयर्स येथे होणाऱ्या कॉन्मेबोल लिबेर्तादोरेस स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर निश्चित होईल. स्पर्धेचा ड्रॉ डिसेंबरमधील काढण्यात येईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.