Maharashtra Election 2024 Tekchand Savarkar big statement after BJP rejected his candidature PPK
Marathi October 22, 2024 02:24 AM


कामठी विधानसभेतून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना डच्चू देत त्यांच्याजागी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आमदार टेकचंद सावरकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नागपूर : भाजपाने रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदारसंघातच कायम ठेवण्यात आले आहे. परंतु, कामठी विधानसभेतून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना डच्चू देत त्यांच्याजागी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आमदार टेकचंद सावरकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, याबाबत आता त्यांनी पक्षाने न दिलेल्या उमेदवारीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Maharashtra Election 2024 Tekchand Savarkar big statement after BJP rejected his candidature)

भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार टेकचंद सावरकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या व तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी निवडून येण्याच्या लायकीचा उमेदवार नसेल असे पक्षाला वाटत असेल. त्यामुळे पक्षाने माझे तिकीट कापले. मी पक्षाच्या निर्णयावर समाधानी नसलो तरी पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहणार आहे, असे टेकचंद सावरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. टेकचंद सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र, यंदा भाजपच्या पहिल्या यादीत कामठी मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सलग तीन टर्म आमदार असलेल्या बावनकुळेंचे तिकीट कापून टेकचंद सावरकरांना संधी दिली होती.

– Advertisement –

हेही वाचा… Ratnagiri Assembly : रत्नागिरीकरांना हवा बदल, भाजपा नेत्याचा मंत्री उदय सामंतांच्या उमेदवारीला विरोध

आमदार टेकचंद सावरकर यांनी महिन्याभरापूर्वी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. “आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली? हे तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरासमोर मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी भाजपाला मतदान करतील, यासाठी आम्ही हा जुगाड केला आहे. हे सर्वजण खोटे बोलले असतील. मात्र, मी खरे बोलतो. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर बोलायचे एक आणि करायचे एक, असे करायला मी रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?” असे विधान सावरकर यांनी केले होते. ज्यामुळे त्यांना पक्षाकडून डच्चू देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.