लाडकी बहीण योजना बंदच्या अफवा सुरू
esakal October 22, 2024 02:45 AM

मनोर, ता. २१ (बातमीदार) : महाविकास आघाडीमध्ये अनेकांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही स्पर्धा नसल्याचे सांगत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असल्याची अफवा विरोधी पक्षांकडून सुरू असल्याची टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. सरकार लोकांसाठी काम करणारे आहे. महाविजय संवाद मेळाव्यासाठी रविवारी (ता. २०) खासदार शिंदे पालघरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यासाठी काहींनी दिल्लीवारी केल्याचा टोला डॉ. शिंदे यांनी विरोधी पक्षाला लगावला. पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात डॉ. शिंदे महाविजय संवाद दौऱ्यात पालघर आणि बोईसर मध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी शनिवारी आले होते.
महायुती सरकार पाच महिन्यांत दोन कोटी ३० लाख बहिणींपर्यंत पोहचले आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळालेल्या लाभामुळे बहिणींमध्ये सरकार प्रती आपुलकीची भावना आहे. योजना यशस्वी झाल्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. पाच महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा झाले असताना योजना बंद केली जाणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. महाविकास आघाडीला सर्वच बंद करण्यात रस आहे, असेही ते म्हणाले. जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे विरोधी पक्षांचे मनसुबे हरियाणा राज्यात मतदारांनी उधळून लावल्याचे सांगत राज्यात हरियाणाप्रमाणे निकाल लागतील, असा आशावाद व्यक्त केला.

मतदारांमध्ये आपुलकीची भावना
महाविकास आघाडीने दोन वर्षे सरकारला शिव्या देण्याचे काम केले. महायुती सरकारच्या कामामुळे राज्यातील महिला आणि युवकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. लेक लाडकी, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठी सरकारने योजना आणून दिलासा दिला. जनसंवाद यात्रेतून राज्यातील ५०पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

पांगारकरांच्या नियुक्तीला स्थगिती
गौरी लंकेश हत्येच्या कटातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

लवकरच उमेदवार जाहीर करणार
भाजपने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लवकरच शिवसेनेकडून आपले उमेदवार जाहीर केले जातील. पालघर आणि बोईसरमधील उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.