कापून ठेवलेले पीक गेले वाहून
esakal October 22, 2024 02:45 AM

मोखाडा, ता. २१ (बातमीदार) : परतीचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावरच ऊठला आहे. सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने उभे पीक आणि कापून शेतात ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मोखाड्यात १९ ऑक्टोबरला झालेल्या मुसळधार पावसाने शिरसगाव येथील लक्ष्मण पाटील या शेतकऱ्याचे एक एकर क्षेत्रातील कापून ठेवलेले भातपीक वाहून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील अन्य भागांतही अशाच नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता वर्षभर कुटुंबाची गुजराण कशी करायची, असा मोठा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे.
तीन दिवसांपासून परतीचा पाऊस मोखाड्यात मुसळधार कोसळत आहे. ऐन खरिपाच्या पीक कापणीचा हंगाम सुरू असताना, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर घाला घातला आहे. कापणीला आलेले उभे पीक शेतातच पावसामुळे आडवे झाले आहे. शेतात कापून ठेवलेले पीक काळे पडून कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, १९ नोव्हेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने शिरसगाव (काकडोशी) लक्ष्मण पाटील या शेतकऱ्याने कापणी केलेले भातपीक वाहून गेले आहे. यंदा त्यांच्या शेतात भरघोस पीक आले होते.
प्रतिवर्षी या शेतातून ते सुमारे ३० पोते भाताचे उत्पन्न घेत असतात. त्याच्यावरच तो आपल्या कुटुंबाची वर्षभर गुजराण करत असतो. पिकाच्या नुकसानीच्या तसेच पीक वाहून गेल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडल्या आहेत. शेतीच्या उत्पन्नावरच चरितार्थ असलेल्या कुटुंबावर उपासमारी ओढावणार आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

उपसभापतींचा सरकारला घरचा आहेर
आदिवासी भागात झालेल्या पिकांच्या नुकसानीला सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. मात्र, द्राक्ष, कपाशीसह अन्य पिकांचे नुकसान झाल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना सरकारकडून जास्त भरपाई दिली जाते. त्यामुळे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदतीची मागणी करत मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती व शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.