Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी
esakal October 22, 2024 06:45 AM

Vidhan sabha election: राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबरला दाखल अर्जांची छाननी होईल. तर ४ तारीख ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या रकमेची देवाण-घेवाण आणि वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर आहे. पुण्यातल्या खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाच कोटी रुपयांची रक्कम एका गाडीत सापडली आहे. एमएच ४५ एएस २५२६ क्रमांकाच्या गाडीतून ही रक्कम नेली जात होती.

सदरील गाडी सांगोला येथील नलवडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे. या रकमेशी सत्ताधारी नेत्याच्या संबंध असल्याचंही बोललं जातंय. पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक विभागाचे अधिकारीदेखील पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक ट्वीट करुन या रकमेशी शहाजीबापू पाटील यांचा संबंध असल्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी आरोप केलाय की, शिंदे हे निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी रुपये पाठवत आहेत. त्याचा हा पहिला हप्ता.

संजय राऊत यांचं ट्वीट

मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी सापडले!

हे आमदार कोण?

काय झाडी… काय डोंगर….

मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले

५ कोटीचा हा पहिला हप्ता!

काय बापू.. किती हे खोके?

असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. या ट्वीवरुन राऊतांचा रोख हा शहाजीबापू पाटील यांच्याकडे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.