सरकारी कर्मचारी निवडणूक कामाला
esakal October 22, 2024 02:45 AM

डहाणू, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हळवे आणि निमगरवे जातीच्या कापणीला आलेले भातपीक दररोज संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे हातचे गेले आहेत. ते आडवे होऊन खाचरातच कोंब फुटत आहे. फुकट गेलेल्या भातपिकांचे पंचनामे करणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक विधानसभा निवडणूक कामाच्या दावणीला जुंपले आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.
परतीच्या पावसाने हळव्या आणि निमगरव्या जातीचे, कापणीला आलेले भातपीक, दोन-तीन दिवस कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापणी केली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून डहाणू तालुक्यात ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटात सतत संध्याकाळच्या वेळेला धो-धो पाऊस कोसळत आहे. भातकापणी केलेल्या खाचरामध्ये तलाव साचले असून, भातपिके पूर्णपणे बुडून गेली आहेत. ही भातपिके सतत पाण्यात राहिल्याने त्यावर मोठमोठे पुनर्लावणी करण्याइतके कोंब फुटू लागले आहेत. हे सर्व भातपीक हातचे गेले आहेत. हळव्या जातीचे रत्नागिरी-२४ वाणासारख्या उभ्या भातपिकावर वरच्या वर कोंब फुटून तेदेखील हातचे गेले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय पीकविमा योजनेत एक रुपया विमा हप्ता भरून पीकविमा घेतला आहे. त्यांनी शेतात नुकसान होताच २४ तासांत विमा कंपन्या कळवणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. त्यामुळे भातपीक नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी विधानसभा निवडणूक कामाला जुंपले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईचे एक टक्काही पंचनामे अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाहीत.

डहाणू तालुक्यात आठवडाभर सतत संध्याकाळच्या वेळेला धो-धो पाऊस कोसळत आहे. त्याने हळव्या आणि निमगरव्या जातीचे तयार होऊन कापणीला आलेले भात, तसेच कापणी केलेले भातपीक खाचरात पडून राहिले आहे. त्यावर मोठे कोंब फुटून भातपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी तहसीलदाराने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी पंचनामा करणारे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांना मात्र निवडणुकीच्या कामात गुंतवले आहे. पंचनामे करण्याचे काम संथ गतीने चालले आहे. ते तातडीने करण्यात यावे.
- सुरेंद्र पाटील, शेतीनिष्ठ शेतकरी, माजी सभापती, पंचायत समिती, डहाणू

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.