हरियाणातील मंत्र्यांना विभागांचे वाटप
Marathi October 22, 2024 12:25 PM

मुख्यमंत्री सैनी यांच्याकडे अर्थ, गृहसह 12 विभाग

';

वृत्तसंस्था / चंदीगढ

हरियाणात सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये समाविष्ट असणाऱ्या मंत्र्यांना विभागांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी स्वत:कडे गृहविभाग, अर्थविभागासह 12 विभाग घेतले आहेत. ज्येष्ठ नेते अनिल विज यांना ऊर्जा आणि वाहतूक विभाग सोपविण्यात आला आहे. इतर मंत्र्यांनाही विभाग सोपविण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सैनी यांनी गृहविभाग आणि अर्थ विभाग हे महत्वाचे विभाग स्वत:कडेच ठेवले आहेत. त्याचप्रमाणे, नियोजन, उत्पादनशुल्क आणि करसंकलन, शहर आणि ग्रामीण नियोजन, शहर मालमत्ता, सूचना आणि प्रसारण, सार्वजनिक संबंध, भाषा आणि संस्कृती, गुन्हा अन्वेषण, कायदा, विधिमंडळ व्यवहार आणि गृहबांधणी हे विभागही त्यांनी स्वत:कडेच घेतले आहेत. अनिल विज हे मागच्या मनोहरलाल खट्टर सरकारच्या काळात गृहमंत्री होते. त्यांच्याकडे आता ऊर्जा आणि वाहतूक विभागासह कामगार कल्याण विभागही सोपविण्यात आला आहे.

आरोग्य विभाग आरती राव यांच्याकडे

महत्वाच्या आरोग्य विभागाचे उत्तरदायित्व आरती सिंग राव यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागही देण्यात आले आहेत. राव नरबीर सिंग यांना उद्योग आणि व्यापार, पर्यावरण, वनसंवर्धन आणि वन्यजीवन असे विभाग सोपविण्यात आले आहेत. विपुल गोयल यांच्याकडे महसूल आणि आपत्तीव्यवस्थापन, शहरी स्थानिक संस्था आणि नागरी विमानवाहतूक असे विभाग देण्यात आले आहेत. अरविंद शर्मा यांना कारागृह आणि सहकार विभाग, महिपाल धांडा यांच्याकडे शालेय शिक्षण, श्यामसिंग राणा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण, रणवीर गंगवा यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, कृष्णकुमार बेदी यांच्याकडे सामाजिक न्याय, सबलीकरण, अनुसूजित जाती आणि मागावर्गिय कल्याण, तर श्रुती चौधरी यांच्याकडे महिला आणि बालकल्याण असे विभाग वितरण करण्यात आले आहे.

इतर मंत्र्यांनाही वाटप

इतर मंत्र्यांपैकी क्रिशनलाल पन्वर यांना विकास, पंचायत, खाण आणि भूगर्भ विभाग, राजेश नागर (राज्यमंत्री, स्वतंत्र पदभार) यांना अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण विभाग तर गौरव गौतम (राज्यमंत्री, स्वतंत्र पदभार) यांना युवककल्याण, उद्योजकता आणि क्रीडा विभाग असे वाटप करण्यात आले आहे.

राज्यपालांकडून सूचना

मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी केलेल्या सूचनेनुसार हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांनी मंत्र्यांना विभाग वाटप केले आहे, अशी घोषणा राज्यपालभवनातून करण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांनी त्वरित आपल्या विभागाची सूत्रे हाती घेतली असून कार्याला प्रारंभ केल्या असल्याची माहिती देण्यात आली.

भाजपचा विक्रमी विजय

नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय प्राप्त केला आहे. हा पक्ष या राज्यात सलग तिसऱ्यांना सत्ताधारी पक्ष बनला असून हरियाणाची स्थापना झाल्यापासूनच्या 13 विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तीनदा सरकार स्थापना कोणत्याही पक्षाला करता आलेली नाही. भारतीय जनता पक्षाने हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांपैकी 48 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले आहे. प्रचंड विजयाच्या अपेक्षेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला 37 जागा मिळाल्या असून प्रादेशिक पक्षांचा मोठा पराभव झाला आहे. यापूर्वी काँग्रेस पक्ष या राज्यात 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्षे सत्तेवर होता. इतर विधानसभा निवडणुकांमध्ये नेहमी सत्तापालट घडलेला आहे. भारतीय जनता पक्ष 2014 पासून सलग सत्तेवर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.