Kalina Vidhan Sabha 2024 : कलिन्यातून संजय पोतनीसच जिंकतील याची खात्री नाही, कारण…
GH News October 22, 2024 05:15 PM

कलिना हा मुंबई उपनगरमध्ये येणारा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. कलिनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत. संजय पोतनीस यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. महत्त्वाच म्हणजे या कलिना विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 57 हजारपेक्षा जास्त आहे. मात्र, तरीही मागच्या दोन टर्मपासून या मतदारसंघात संजय पोतनीस यांच्या रुपाने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या आमदारांना तयारीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संजय पोतनीस मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.

महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार की, भाजपा लढवणार याबद्दल अजूनही चित्र स्पष्ट नाहीय. भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. त्यात मुंबईतील कलिन्यातून उमेदवार दिलेला नाही. महायुतीमध्ये विजयी मतदारसंघ ज्या पक्षाकडे आहे, त्यांच्याकडेच तो राखला जाईल असं ठरलय. ग्राऊंड लेव्हलवरील ताकद लक्षात घेता शिवसेना शिंदे गट ही जागा लढवणार का? हा प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गटाकडून कृष्णा हेगडे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. तेच भाजपाकडून अमरजित सिंह यांना इथून लढायचं आहे.

कलिना विधानसभेच्या मागच्या तीन निकालांवर नजर टाकूया

2009 साली कृपाशंकर सिंह या मतदासंघातून विजयी झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेली. आता ते भाजापमध्ये आहेत.

2009 साली कृपाशंकर सिंह कलिना विधानसभा मतदारसंघातून 12, 921 मतांनी विजयी झालेले.

मनसेचे चंद्रकांत मोरे 38,284 मतं घेऊन दुसऱ्या स्थानावर होते.

कृपाशंकर सिंह यांना 51,205 मतं मिळालेली.

2014 मध्ये काय झालं?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पाचही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढलेले. त्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर संजय पोतनीस 1,297 मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झालेले.

संजय पोतनीस यांना 30,715 मतं मिळालेली.

भाजपाचे अमरजित सिंह 29,418 मतं मिळवून दुसऱ्या स्थानावर होते.

कृपाशंकर सिंह 23,595 मतं घेऊन तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

2019 मध्ये काय झालं?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे संजय पोतनीस विजयी झाले. त्यावेळी शिवसेना-भाजपा युती असल्यामुळे पोतनीस 4,931 मतांनी विजयी झाले.

संजय पोतनीस यांना 43, 319मतं मिळाली.

काँग्रेसचे जॉर्ज अब्राहम यांना 38,388 मतं मिळाली.

मनसेचे संजय तुर्डे यांना 22, 405 मतं मिळाली.

2024 मध्ये छातीठोकपणे सांगता येणार नाही

आता 2024 मध्ये कलिना विधानसभा मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार? हे छातीठोकपणे सांगता येणार नाही. कारण मागच्या दोन टर्ममध्ये विजयाच अंतर 5 हजारपेक्षा कमी होतं.

लोकसभेला कलिनामध्ये लीड कोणाला?

कलिना विधानसभा क्षेत्र उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतं. त्यात वांद्रे पूर्व, कुर्ला, चांदिवली, कलिना या चार मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संजय पोतनीस यांना पुन्हा तिकीट मिळालं, तर त्यांच्यासाठी लढाई थोडी सोपी असेल.

एकूण मतदारसंख्या किती?

कलिन विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 39 हजार 863 मतदार आहेत. यात नव मतदारांची संख्या 2,995 आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.