Diwali Cleaning Tips: पिवळे आणि तेलकट झालेले संगमरवरी देवघर दिवाळीच्या आधी असे करा स्वच्छ, न घासता येईल नवीन चमक
Times Now Marathi October 23, 2024 01:45 AM

Diwali Cleaning Tips: लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या आधी प्रत्येकांनी घराची साफसफाई करायला घेतली असेल, या दरम्यान नको असलेल्या वस्तु बाहेर फेकून देणे, खराब वस्तु ठीक करणे, तसेच स्वच्छ करणे या सर्व गोष्टी युद्धपातळीवर सुरू झाल्या आहेत. ज्यामध्ये देवघर आणि पूजा साहित्यांच्या साफसफाईचा देखील आवर्जून समावेश होतो. अशावेळी दिवाळीच्या आधी घरातील पिवळे झालेले संगमरवरी देवघर नव्यासारखे चमकवण्यासाठी काय करता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या उपाय.

संगमरवरी मंदिराचा पिवळसरपणा कसा काढावा? (How to Clean Marble Temple at Home?)
बहुतांश लोकांच्या घरात संगमरवरी देवघर असतात. हे देवघर दिसायला खूप आकर्षक दिसतात, आणि त्यामध्ये बसवलेले देव देखील खूप सुंदर दिसतात. पण ही मंदिरं काही काळानंतर पिवळी पडू लागतात, तसेच दररोज अगरबत्ती जाळल्याने काळीदेखील पडतात. तुमच्याही घरातील संगमरवरी मंदिराची अशीच अवस्था झाली असेल तर त्याला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या काही सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.

पिवळसर आणि तेलकट झालेले संगमरवरी देवघर साफ करण्यासाठी टिप्स
संगमरवरी देवघर स्वच्छ करण्यासाठी, सर्वप्रथम देवांच्या सर्व मूर्ती बाहेर काढा आणि त्या वेगळ्या ठेवा. यानंतर मंदिर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून काढा.

व्हिनेगर आणि लिंबू वापरा
संगमरवरी देवघरचा पिवळसारपणा काढण्यासाठी 1 लिटर पाण्यात 1 कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा. हे द्रावण स्पंजच्या मदतीने मंदिरावर लावा आणि 5-10 मिनिटांनंतर स्क्रबने घासून स्वच्छ करा.

सौम्य साबणाने स्वच्छ करा
अर्धी बादली पाण्यात एक कप लिक्विड सोप घाला. नंतर त्यात एक मऊ कापड बुडवून ते पिळून घ्या आणि मंदिराच्या पृष्ठभागावर हलक्या हाताने घासून घ्या, नंतर स्वच्छ कापडाने मंदिर पुसून टाका.

बेकीग सोडा
मार्बलवर पिवळे किंवा काळे डाग असतील तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवून त्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे राहू द्या, नंतर हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.

दुधाच्या पाण्याने स्वच्छ करा
संगमरवराची चमक कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी दूध आणि पाण्याचे मिश्रण बनवा आणि कापडाच्या साहाय्याने ते स्वच्छ करा. यामुळे संगमरवर पांढरा आणि चमकदार राहतो.

जास्त पाणी वापरणे टाळा
संगमरवरी मंदिराची स्वच्छता करताना जास्त पाणी वापरू नका, कारण संगमरवरी पाणी शोषून घेऊ शकते आणि त्यामुळे त्याचा रंग बदलू शकतो. त्यामुळे फक्त ओल्या कपद्यानेच ते पुसून काढा.

मार्बल पॉलिशिंग पावडर
आजकाल बाजारात मार्बल पॉलिशिंग पावडर आणि मार्बल क्लीनर सहज उपलब्ध होऊन जातो. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे घरचे देवघर सहज स्वच्छ करू शकता.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.