मालकाडी परिपक्व होण्याच्या प्रक्रियेला खीळ
esakal October 23, 2024 03:45 AM

काटेवाडी, ता. २२ : परतीचा पाऊस व ढगाळ हवामान यामुळे द्राक्षबागांमध्ये मालकाडी परिपक्व होण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. परिणामी द्राक्ष बागांच्या मालछाटण्यांवर परिणाम झाला आहे. डाऊनी, करपा, जीवाणूजन्य करपा, तांबेरा आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बागांवर झाला आहे. इंदापूर, दौंड, बारामती तसेच जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत.

द्राक्षबागांमध्ये वेलींच्या पानांचे योग्य व्यवस्थापन वेलींची वाढ, आकार, उंची आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी महत्त्वाचे असते. पाऊस व उघडीप अशा दोन्ही बाबींमुळे द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पानगळ झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यावर जास्त तापमान व जास्त आर्द्रता असे सध्या चित्र आहे तर पावसाळी वातावरण असताना कमी तापमान व जास्त आर्द्रता या सोबत हलक्या ते मध्यम प्रतीचा पाऊससुद्धा पडतो. त्यामुळे वातावरण सतत बदलत राहिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या फवारण्यादेखील निष्प्रभ ठरत आहेत.

द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
जास्त पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्षबागामध्ये विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. पानगळ झाल्याने माल छाटणीसाठी काडी परिपक्व झाली नसल्याचे प्रकार दिसून येऊ लागले आहेत. द्राक्षवेलींवर पाहिजे त्या प्रमाणात पाने नसल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते. परिणामी काडी परिपक्व होत नाही. यासाठी बागेतील रोग नियंत्रणामध्ये आणून पुन्हा पाच ते सहा पाने वाढू देणे गरजेचे आहे. तसे केल्यास काडी परिपक्व होण्यास मदत होईल. मात्र काडी परिपक्व होण्यास यंदा उशीर लागण्याची शक्यता आहे.

सध्य स्थितीत द्राक्षांवरील रोग...
वातावरणात १७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व त्यासोबत १० मिलिमीटर झालेला पाऊस व ४० टक्क्यांपेक्षा जास्त असलेली आर्द्रता या स्थितीमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादूर्भाव सहज वाढतो. अर्ध्या परिपक्व ते कोवळे पान या स्थितीत डाऊनीच्या प्रादुभार्वास लवकर बळी पडते.
१) भूरी : हा रोग शाकीय वाढीची अवस्था, ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढत असलेल्या परिस्थितीत दाट कॅनोपीमध्ये जास्त वाढतो. रोगाचा प्रसार होण्यासाठी वातावरणात २० ते २७ अंश सेल्सिअस तापमान व ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आवश्यक असते.
२) करपा : वातावरणात उष्ण वातावरण, ओलावा व ठगाळ परिस्थिती असल्यास नवीन फुटींची वाढ जास्त प्रमाणात होताना दिसून येईल. अशा वेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पानांवरील पेशी मरतात व छिद्र पडते. काही परिस्थितीत हिरव्या काडीवर प्रादुर्भाव झाल्यामुळे या रोगाचे बिजाणू काडीत प्रवेश करतात यामुळे फुटीची वाढ खुंटते.
३) जीवाणूजन्य करपा : ओलावा आणि उबदार वातावरण निर्माण झाल्यास या रोगाची लक्षणे पानावर दिसून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपा रोगाच्या लक्षणाप्रमाणेच पानाच्या खालील बाजूस डाग दिसून येतात. कालातंशने हे डाग मोठे होऊन फुर्टीची वाढ खुंटते किंवा थांबते.


वातावरणातील बदलाला सामोरे जात चालू वर्षीचा द्राक्ष हंगाम यशस्वी करण्यासाठी बागायतदार अहोरात्र मेहनत करताना दिसत आहेत. करपा, डाऊनी, भुरी या मुख्य रोगांवर तसेच फूल किडे, उडद्या, पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडींच्या नियंत्रणासाठी बागायतदार शास्त्रीय ज्ञानाचा वापर करीत आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस फळ छाटण्यांनी मोठ्या प्रमाणावर गती घेतल्याचे दिसत आहे.
- राजेंद्र वाघमोडे, संचालक, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूर


00684

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.