कौटुंबिक वादानंतर वेगवेगळ्या दाव्यांचा डाव
esakal October 23, 2024 03:45 AM

सनील गाडेकर
पुणे, ता. २२ ः जोडीदाराला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या शहरांतील न्यायालयांत अनेक अर्जांद्वारे दावे दाखल करायचे, न्यायालयांच्या चकरा मारायला लावून त्याला जेरीस आणायचे, पोटगी किंवा देखभाल खर्च लवकर मिळावा आणि दाव्यात लवकर तडजोड व्हावी म्हणून असे डाव टाकले जात आहेत. पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यानंतर असे प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. पती आणि पत्नी हे दोघेही असे करतात.
एकमेकांच्या विरोधात टोकाची नाराजी निर्माण होऊन जोडीदाराला आणि त्याच्या घरच्या व्यक्तींना जास्तीत जास्त त्रास दिला जातो. जोडीदाराने वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केलेले दावे एकाच ठिकाणी चालावे म्हणून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. त्रास देण्याच्या उद्देशाने असे कृत्य करण्यात आले असेल तर दावेदाराला फटकारून एकाच ठिकाणी सुनावणी घेण्याचा आदेश दिला जातो. तसा आदेश आल्यास दावे करणारा जोडीदार अपील करू शकतो.
सासर, माहेर, नोकरीचे ठिकाण
वेगवेगळे दावे दाखल करताना पत्नीकडून सासर, माहेर आणि तिच्या नोकरीचे ठिकाण अशा पत्त्यांचा आधार घेतला जातो. सासरी नांदताना तेथे काय झाले, मग पतीने माहेरी आणि नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात राहताना तेथे येऊन त्रास दिल्याचे दाव्यात नमूद केले जाते. लग्नानंतर दोघे थोड्या कालावधीसाठी राहिलेल्या आणि पतीचे घर असलेल्या गावात दावा दाखल केला जातो.
---

... म्हणून वेगवेगळे दावे
- पोटगी किंवा देखभाल खर्चाचा आदेश लवकर मिळावा
- जोडीदाराला मुद्दाम त्रास व्हावा
- कौटुंबिक वाद चिघळावा
- त्रासातून जोडीदाराला प्रकरण लवकर मिटविणे भाग पडावे
- तडजोडीची रक्कम हवी तेवढी मिळावी
---
हे दावे केले जातात
- कौटुंबिक हिंसाचार
- अंतरिम पोटगी
- मुलांच्या शिक्षणासाठी खर्च मिळावा
- नांदायला येण्याबाबत
- नांदायला घेऊन जाण्याबाबत
---

काही वेळा वाद वेगवेगळ्या ठिकाणी झालेला असतो. त्यामुळे त्या-त्या न्यायालयाच्या हद्दीत दावे दाखल केले जातात. मुळात पती किंवा पत्नी या दोघांनाही कायद्याने काही हक्क व अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करून असे दावे दाखल केले जातात. ते एकाच ठिकाणी चालविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागता येते. दाव्यांमधील तथ्य विचारात घेऊन न्यायालय योग्य तो निकाल देते.
- ॲड. सुप्रिया कोठारी, जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या वकील
-----

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.