Sakshi Malik: बजरंग, विनेश यांच्यामुळे कुस्ती आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला; साक्षी मलिकची टीका
esakal October 23, 2024 01:45 AM

Sakshi Malik criticized Vinesh Phogat Bajrang Punia: बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आशियाई स्पर्धेसाठी चाचणीतून अवलत मिळवली आणि त्यामुळे ब्रिजभूषणशरण सिंग यांच्याविरोधात आम्ही तिघांनी करत असलेल्या आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला, अशी टीका साक्षी मलिक हिने केली आहे.

हे आंदोलन स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यात येत असल्याचा रंग निर्माण झाला, असेही साक्षीने म्हटले आहे.

ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात दिल्लीत गाजलेल्या आंदोलनात साक्षी मलिक महत्त्वाची आंदोलक होती. ‘व्हिटनेस’ या आपल्या पुस्तकात तिने बजरंग आणि विनेश या आपल्या सहकाऱ्यांवरच नाराजी व्यक्त केली आहे. बजरंग आणि विनेश यांच्या जवळचे लोक त्यांच्या मनात अशा प्रकारची लालस निर्माण करू लागले होते, असेही साक्षीने म्हटले आहे.

साक्षी, विनेश आणि बजरंग या तिघांनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण हे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप करत आंदोलन उभे केले होते. यासंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे.

या आरोपांमुळे भारतीय कुस्ती प्रशासनात मोठे वादळ निर्माण झाले होते. ब्रिजभूषण यांच्यासह कुस्ती महासंघ बरखास्त करून त्या ठिकाणी हंगामी समिती नियुक्त करण्यात आली होती. या हंगामी समितीने बजरंग आणि विनेश यांना आशिया गेम्स स्पर्धेच्या चाचणीतून सूट दिली होती.

या दोघांनी अशी सूट मिळवायला नको होती, असे साक्षीचे म्हणणे आहे. साक्षी या चाचणीत सहभागी झाली नाही. विनेशला आशियाई स्पर्धेअगोदरच दुखापत झाली तर स्पर्धेत सहभागी झालेल्या बजरंगला पदक मिळवता आले नव्हते.

चाचणी स्पर्धेतून तुम्ही सूट मिळण्याची मागणी करा, असा सल्ला बजरंग आणि विनेशच्या जवळचे लोक त्यांचे कान भरत होते, असे साक्षीने आपल्या पुस्तकात उघडपणे म्हटले आहे; परंतु हे लोक कोण होते यांचा उल्लेख केला नाही.

बजरंग आणि विनेश यांनी चाचणीतून सूट मिळवली खरी; परंतु त्यातून काहीच फायदा झाला नाही. त्यांच्या या मागणीचा परिणाम आंदोलनाच्या प्रतिमेवर झाला. अनेक जण हे आंदोलन स्वार्थासाठी तर केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करू लागले होते, असे साक्षीने म्हटले आहे.

पुढे कालांतराने विनेश आणि बजरंग हे काँग्रेस पक्षात दाखल झाले, विनेशने तर हरियाना विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ही घडामोड घडण्याअगोदर पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत विनेशचे पदक १०० ग्रॅम वजन अधिक झाल्यामुळे हुकले. त्याची फार मोठी चर्चा झाली आणि विनेशभोवती मोठी सहानुभूतीही निर्माण झाली होती.

बालवयात विनयभंग

साक्षीने आपल्या या पुस्तकात धक्कादायक माहिती उघड केली आहे. ट्युशन शिक्षकाने आपला विनयभंग केला होता. ही आपली चूक आहे, असा समज करून मी कुटुंबीयांना हा प्रकार सांगण्यास घाबरले होते.

शाळेतील माझे हे ट्युशन शिक्षक मला घरी येण्यास सांगायचे आणि स्पर्श करायचे. शेवटी मी ट्युशन क्लासला जाण्यास घाबरायचे; पण हा प्रकार मी आईला सांगू शकत नव्हते, असे साक्षीने या पुस्तकात म्हटले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.