इस्रायली सैनिकांना दवाखान्याखाली सापडला खजाना! दहशतवादी संघटनेचं गुप्त खंदक, रोकड अन् सोनं...
esakal October 23, 2024 01:45 AM

तेल अवीव : इस्राईलच्या सैनिकांना बैरुत येथे अल साहेल रुग्णालयाखाली दहशतवादी संघटना हिज्बुल्लाचे एक गुप्त खंदक सापडले असून तेथे सुमारे ५० कोटी डॉलरची रोकड सापडली. त्याचे भारतीय मूल्य ४ हजार कोटी रुपये आहे.

या खंदकात केवळ रोकडच नाही तर सोने देखील सापडले आहे. जप्त केलेल्या सोन्याचे प्रमाणही लक्षणीय आहे, असे इस्राईलच्या सैनिकांनी म्हटले आहे. इस्राईल सैनिकांच्या मते, गुप्त खंदकाची निर्मिती हिज्बुल्ला संघटनेचा म्होरक्या नसरल्लाने केली होती. या रोकडचा आणि सोन्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता.

इस्राईल आणि लेबनॉनची दहशतवादी संघटना हिज्बुल्ला यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. गेल्या महिन्यात इस्राईलने हिज्बुल्ला संघटनेविरोधात मोठी मोहीम उघडली. पेजर हल्ले करत संघर्षाची धार आणखी तीव्र केली. काही आठवड्यानंतर इस्राईल सैनिकांनी तर हिज्बुल्ला संघटनेच्या महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले. इस्राईलकडून सतत हवाई हल्ले केले जाऊ लागले आणि त्यात म्हेारक्या हसन नसरल्लासह दोन नवीन प्रमुख, अन्य कमांडर आणि दहशतवादी देखील मारले गेले.

इस्राईलकडून सातत्याने लेबनॉनवर हल्ले केले जात आहेत. आता तर जमिनीवरून कारवाई सुरू केली आहे. बैरूत येथे इस्राईल सैनिकांनी काही ठिकाणांचा ताबा घेतला असून तेथे झडतीसत्र राबविले जात आहे. यावेळी इस्राईलच्या सैनिकांना एका खंदकातून घबाड नव्हे तर खजिना सापडला आहे. आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, दक्षिण बैरूत येथील अल सालेह रुग्णालयाच्या खंदकात ५० कोटी डॉलरची रोकड आणि सोने सापडले. या पैशातून लेबनॉन देशाची पुनर्उभारणी करता येऊ शकते. इस्राईल सैनिकांनी हिज्बुल्ला संघटनेच्या आर्थिक ठिकाणांवर हल्ले केले. कडक सुरक्षा व्यवस्था असणारी ही गोपनीय जागा इस्राईल सैनिकांच्या रडारवर होती. ही एक भूमिगत तिजोरी असून त्यात रोकड, सोन्याच्या रूपातून अब्जावधी रुपये ठेवण्यात आले होते. या पैशाचा वापर हिज्बुल्ला संघटनेकडून इस्राईलवर हल्ला करण्यासाठी केला जात होता. मात्र या हल्ल्यात पैशाची स्थिती काय झाली, हे मात्र हगारी यांनी सांगितले नाही.

खंदक कोठे?

डॅनियल हगारी यांनी अल साहेल रुग्णालयाखाली खंदक तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी खंदकाचा नकाशा दाखविला. त्यात दक्षिण बैरूतचे उपनगर अल साहेल रुग्णालयाखाली खंदकाचे ठिकाण आहे. म्होरक्या नसरल्लाचे हेच मोठे ठिकाण होते, असे त्यांनी सांगितले. लेबनॉनचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी हिज्बुल्ला संघटनेला मदत करू नये, असे आवाहन इस्राईलने केले आहे. इस्राईलचे हवाई दल देखरेख करत असून इस्राईल केवळ हिज्बुल्ला संघटनेशी लढत असून लेबनॉनच्या जनतेशी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आयडीएफ रुग्णालयावर हल्ला करणार नाही, असेही सांगितले. तत्पूर्वी इस्राईलने हिज्बुल्ला संघटनेशी संबंधित असलेल्या एका बँकेवर हल्ला केला होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.