लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन, 5 कोट
Marathi November 06, 2024 03:24 PM

मुंबई: अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी (baba Siddique Murder) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या आजुबाजूला अनेक लोक उपस्थित होते. या व्यक्तींचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरु असताना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून (lawrence bishnoi gang) प्रत्यदर्शींपैकी एका साक्षीदाराला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी आता संबंधित प्रत्यक्षदर्शीने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीला  काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. या अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराला धमकावत त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी  प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला देण्यात आली. हा फोन लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता पोलीस साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.

पोलीस ‘त्या’ कैद्यांचे हस्ताक्षर तपासणार

अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना 2022 मध्ये एक धमकीचे पत्र आले होते.  सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ते धमकीचे पत्र लिहिले असावे, असा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे. मुंबई गुन्हे शाखेने विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल करून कारागृहात कैद असलेल्या आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकी गुप्ता, सागर पाल, मोहम्मद चौधरी आणि हरपाल हरदीप सिंग यांच्या हस्ताक्षराचे नमुने हवे आहेत. पोलिसांना त्या धमकीच्या पत्राचे हस्ताक्षर या आरोपींच्या हस्ताक्षराशी जुळत आहेत का ? हे पडताळायचे आहे.

5 जून 2022 रोजी सलीम खान यांना घरासमोरील एका बाकावर एक पत्र मिळाले होते.  ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला सिद्धू मुसेवाला प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. परंतु आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांना कोणताही महत्वाचा पुरावा सापडला नव्हता. न्यायालयाने पोलिसांना आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा

सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर…; ‘भाईजान’ला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.