जे बोलतो ते आम्ही करतो! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा जाहीर
Marathi November 07, 2024 04:24 PM

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो. आणि जे बोलतो ते आम्ही करतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या चरणी वचननामा सादर केला. तरुणांना रोजगार, धारावीकरांना न्याय देणार आणि कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंटचा घातलेला घाट हाणून पाडणार, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

निवडणुका म्हटलं की आम्ही मतं मागायची आणि जनतेनं द्यायची, हा एवढाच कारभार असतो असं मला वाटत नाही. मतं कशासाठी द्यायची? कोणाला द्यायची? कोणत्या विचारसरणीला द्यायची? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. काल राहुल गांधी आले होते. मल्लिकार्जुन खरगे होते. पवारसाहेब होते. मी स्वतः होतो. आणि त्या मिटिंगमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रासाठी काय-काय करणार यातले पाच मुद्दे काल प्रकाशित केले. याला पंचसूत्री असं नाव दिलं. विस्ताराने किंवा सविस्तर जाहीरनामा महाविकास आघाडीचा येत्या काही दिवसांत जाहीर होईल. काल मला त्यांनी विनंती केली होती, येत्या 10 तारखेला करायचं ठरवलं आहे. मी महाराष्ट्रात एक-दोन दिवसांपासून फिरतो आहे. आणि कदाचित मी त्या तारखेला मुंबईत नसेन. मुंबईत असलो तर नक्कीच त्या प्रेस कॉन्फरन्सला असेन. पण मुंबईत नसलो तर लगेच महाविकास आघाडीत काहीतरी गडबड आहे, असा काही गैरसमज करून घेऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत महापालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा असेल. आम्ही बरीच वर्षे युतीत होतो. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून महाविकास आघाडीत आहोत. प्रत्येक निवडणुकीत युतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल जाहीरनामा प्रकाशित होत असतो. पण शिवसेना हा पक्ष आघाडीत सहभागी जरी असला तरी शिवसेनेची एक वेगळी वचनबद्धता आहे. 2012 ची महापालिका निवडणूक असेल. युतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला होता. त्यावेळी शिवसेनेच्या जाहीरनाम्यात मुंबईसाठी सागरी महामार्गाचं वचन दिलं होतं. मला अभिमान आहे की ते वचन आम्ही पूर्ण करून दाखवलं. 2017 साली मुंबई महापालिकेत आपण मुंबईकरांना ज्यांची मालमत्ता 500 स्क्वेअर फुटाची आहे त्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या सगळ्या घरांना मालमत्ता कर रद्द करू, असं एक वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण करून दाखवलं. त्यानंतर 2019 ला विधानसभेला सामोरं जातांना युतीचा एक जाहीनामा होता. तेव्हा आम्ही युतीत होतो. पण 10 रुपयांमध्ये गरीबांना आम्ही जेवण देऊ हे एक वचन दिलं. हे महाविकास आघाडीत असूनही शिवभोजन सुरू करून करून दिलं होतं. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. पण शिवसेना म्हणून आमचंही एक कर्तव्य आहे. काही गोष्टी बारीकसारीक असतात, त्या ढोबळमानाने मांडता येत नाही. आपण त्यातलं वेगळेपण काय आहे हे हेरून एक महाविकास आघाडी आणि शिवसेना या माध्यमातून ती वचनं सरकार आल्यानंतर पूर्ण करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजचा हा जो वचननामा आहे तो आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या जनतेला सादर करत आहे. हा वचननामा दोन स्वरुपात असेल. एक तर ज्याला आपण टॉकींग पाॉइंट्स म्हणतो की पटकन काय बोलायचं तर तो खिशात मावेल. काल जसं पंचसूत्री होत्या तसं शिवसेनेची काही वचनं आहेत. त्यात त्या पंचसूत्रीचा अंतर्भाव आहेच. त्याच्यापेक्षा फारकाही वेगळ्या आहेत अशातला भाग नाही. पण थोड्याफार ज्याकाही वेगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या किंवा भासल्या किंवा त्याच्यात यायला पाहिजेत. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांना तेही मान्य आहे. सविस्तर वचननामा घेऊन फिरणं थोडसं अवघड होतं. कार्यकर्त्यांना, वक्त्यांनाही अवघड होतं. खिशात मावेल अशी पाच किंवा दहा ही वचनं आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्यावर क्यूआर कोड दिलेला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर शिवसेनेचा जो वचननामा आहे तो आपल्याला पूर्णपणे वाचता येईल. एक-दोन दिवसांतच महाविकास आघाडीचा जाहीरनामा येतोय. तो सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सर्व मित्रपक्ष यांचा एकत्रित जाहीरनामा आहे. त्यामुळे त्याच्यापासून आम्ही काही वेगळं करतोय का? ते आम्हाला मान्य आहे का? हे आम्हाला मान्य नाही का? स्वतंत्र अस्तित्व दाखवतायत का? असा काहीएक प्रकार यात नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

मुंबईतले आणि महाराष्ट्रातले कोळीवाडे आणि गावठाणं म्हणजे त्यात कोळीबांधव, ख्रीस्ती समाज आला, सगळे आले. यांच्याकडे आता या सरकारची वक्र नजर गेली आहे. या कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय? सगळं एकत्रित करायचं, त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राच्या घशात घालायची, असा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. आमचं सरकार आल्यानंतर त्यांनी केलेला जीआर आहे तो रद्द करू. कोळीवाड्यांचं अस्तित्व, गावठाणांचं अस्तित्व, त्यांची ओळख ही आम्ही कदापि पुसू देणार नाही. आणि त्या सगळ्यांना कोळीबांधवांना असतील, गावठाणं असतील या सर्वांना मान्य होईल, असाच विकास आम्ही करू. अन्यथा काय होईल, कोळीवाडे म्हटलं की मासे सुकत कुठे टाकायचे? इकडे सुकट टाकू नका, तिकडे टाकू नका, मग त्याला बंदी येईल. टॉवर बांधले की प्रत्येक इमारतीला पार्किंग देतात. पण कोळीबांधव त्या पार्किंगमध्ये त्यांच्या होड्या पार्क करू शकणार आहेत का? की तिसऱ्या मजल्यावरची होडी आहे ती काढायची आणि मग समुद्रात न्यायची, असं अजिबात होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा जो काही प्रशस्तपणा आहे, कोळी बांधवांना मासेमारीसाठी लागणारी जी जागा आहे ही तशीच्या तशी कायम ठेवू आणि त्यांना विचारात घेऊनच जसं सीमांकन हे आम्ही सुरू केलं होतं त्यांचं हे अजूनही पूर्ण झालेलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी वचननाम्यावर दिली.

धारावीचा विषय हा केवळ धारावीपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही. धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि तो पाडणारच. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल तर त्यातील अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरांत असेल, दहिसर, मुलुंडला असेल. आता तिथलीही लोक उभी राहिली आहेत. धारावीकरांना धारावी सोडयची नाही. आणि बाकीच्यानाही कळतंय की इकडे नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. जर का आताच्या निविदेप्रमाणे किंवा निविदाबाह्य सवलतींप्रमाणे धारावीचा विकास करण्याचं ठरवलं तर मुंबईकरांवर मुंबईच्या नागरी सुविधांवर असह्य भार पडेल. जर कॅल्युलेशन नीट केलं तर हजार एकर जमीन आजच अदानीला दिलेली आहे. त्याचे तसे आदेश निघालेले आहेत. म्हणून संविधान बचाओ… हे लोकसभा हरल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं की हे एक फेक नरेटिव्ह होतं. मग हे सरकारचे आदेश हे फेक नरेटिव्ह आहेत का? अर्थात आमचं सरकार आल्यानंतर ते आम्ही फेकणारच आहोत. ते काही जागेवर ठेवणार नाही. पण हा सगळा विषय लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की आमच्या परिने काही विषय आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यानुसार आम्ही हा वचननामा प्रकाशित करत आहोत. जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील जरूर आहेत, शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी कदाचित असतील, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईत झोपडपट्ट्या आहेत तसं काही शहरांमध्ये आहेत. तिथे सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच पण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे? मधल्या काळात आदित्य बोलला होता. आमच्या तीन प्रायऑरिटी काय असलीत तर रोजगार. नोकरी… नोकरी… नोकरी… बेकारी तर हटवली पाहिजे. पण त्याच्यासाठी कुठेच आताच्या मिंधे सरकारच्या कारभारात काहीच दिसत नाही. त्यांनी फक्त गद्दारांना नोकऱ्या दिल्या बाकीच्या जनतेला काही दिलेल्या नाहीत. तर आम्ही आमच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मुलं-मुलींना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. आपल्या राज्यात मुलींना शिक्षण मोफत दिलं जातं, आनंदाची गोष्ट आहे. पण मुलींप्रमाणे मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन दिलेलं आहे. पाच जीवनावश्यक वस्तुंचे भाव हे स्थिर ठेवणार, हे सुद्धा वचन आम्ही दिलेलं आहे. आणि या हवेतल्या गोष्टी नाहीत. आम्ही करून दाखवलेलं आहे. महापालिकेत 500 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ केला. शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचं पिक कर्ज माफ करून दाखवलं किंवा मुक्त करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं आहे. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो, असा ठाम विश्वास वचननामा प्रकाशित करताना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.