छत्रपती संभाजीनगर : परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील गट क्रमांक २४० मधील ३६.५० आर जमीन कटकारस्थान रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने घरगड्याच्या माध्यमातून लुबाडल्याचा थेट आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी बुधवारी (ता. सहा) येथे पत्रकार परिषदेत केला.
याप्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात १८ ऑक्टोबर २०२४ ला दावा दाखल केला असून, त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. त्यावर २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
परळी शहर पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगून लवकरच बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिरेवाडी येथील ही जमीन पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड मार्गालगत असून, यातील २७ आर जागा ही शासनाने रस्ते विकासकामासाठी संपादित केली आहे.
उर्वरित ३६.५० आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंडे याच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे करून आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोपही सारंगी महाजन यांनी केला.
#ElectionWithSakal