Maharashtra Weather Updates News in Marathi : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात सध्या चढ उतार पाहायला मिळत आहे. पहाटेच्या तापमानात घट होत असल्याने राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. दुपारी ऊन्हाचा चटका जाणवत असतानाच रात्री थंडी वाढत आहे. पाच दिवस राज्यातील तापामान साधारण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकणी ऊन्हाचा चटका जाणवेल, तर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. (Weather Forecast News in Marathi )
उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे आता कपाटातून बाहेर निघू लागलेत. पुढील काही दिवसांत राज्यात सर्व दूर थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसाने पूर्णपणे माघार घेतल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात थोड्याप्रमाणात थंडी जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणाचे तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने हुडहुडी भरत आहे. निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. गुरुवारी निफाडमध्ये १५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे ३६.३ अंश तापमानाची नोंद झाली.
मागील आठवड्यात पावसानं उघडीप घेतल्याने राज्यात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस राज्यात कोरड्या हवामानसह तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याची स्थिती चक्राकार आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झालाय. त्यामुळे कोकण, विदर्भात आणि दक्षिण महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत राज्यात तापमानात चढ -उतार पाहायला मिळू शकतात.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, निफाड, धुले, नाशिक आणि अहिल्यानगर येथे पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, डहाणू, सोलापूर, अकोला आणि भंडाऱ्यात तापमान जैसे थे राहू शकते. पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकामांना वेग आलाय. काढणी आणि पेरणीच्या कामाला वेग आलाय.