लाडक्या बहिणींची मतदार नोंदणी वाढली
esakal November 09, 2024 01:45 AM

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत २१ विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या संख्येत जवळपास ९२ हजार १६४ ने वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघात झाली आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. एकीकडे ‘लाडकी बहिण’ प्रचाराचा मुद्दा होत असताना दुसरीकडे मतदार नोंदणीतही महिला मतदार आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला आयोगाने जाहीर केली. त्याचदिवशी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या ८७ लाख ५७ हजार ४२६ इतकी होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी १० दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अंतिम मतदार यादी (१५ ऑक्टोबर) आणि नव्याने भर पडलेल्या मतदारांची पुरवणी यादी एकत्रित करून १ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
अंतिम मतदार यादीत २१ विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या ८८ लाख ४९ हजार ५९० इतकी झाली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुरवणी मतदार यादीत ९२ हजार १६४ ने मतदारांची वाढ झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांच्या संख्येत ४१ हजार ५२४ ने तर महिला मतदारांच्या संख्येत ५० हजार ६२९ ने वाढ झाली आहे.

पुण्यात अशी वाढली मतदारसंख्या
१) खडकवासला- १० हजार ६५४
२) वडगावशेरी- ८ हजार ९६७
३) हडपसर- १० हजार ५०२
४) शिवाजीनगर- ४ हजार ५६२
५) कोथरूड- ६ हजार ३२८
६) पुणे कॅंटोमेन्ट- ३ हजार २०
७) पर्वती- ३ हजार ३०९
८) कसबा- १ हजार ३६०
एकूण- ४८ हजार ७०२

खडकवासलात सर्वाधिक नोंदणी
शहरातील आठ विधानसभा मतदार संघात ४८ हजार ७०२ ने मतदारांची वाढ झाली आहे. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या २६ हजार ४०५ इतकी आहे. त्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघातील महिलांनी नाव नोंदणीत बाजी मारली आहे. या मतदार संघात सर्वाधिक ५ हजार ७५० महिलांनी नव्याने नोंदणी केली आहे. त्या खालोखाल हडपसर ५ हजार ६४९ तर, वडगाव शेरीमध्ये ४ हजार ७२५ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. कसबा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे ७५९ महिला मतदारांची नव्याने भर पडली आहे. आठही विधानसभा मतदार संघात पुरुष मतदारांची संख्या २२ हजार २९७ इतकी वाढली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ हजार ९०४ मतदारांची खडकवासला मतदार संघात नव्याने भर पडली आहे. त्या खालोखाल हडपसर ४ हजार ८५३, वडगावशेरी ४ हजार २४२, कोथरूड आणि शिवाजीनगरमध्ये अनुक्रमे २ हजार ६९८ आणि २ हजार २०२ ने भर पडली आहे. तर कसबा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे ६०१ नवीन पुरुष मतदारांची नव्याने भर पडली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.