Pune Accident : झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा जेसीबीखाली सापडून मृत्यू
esakal November 09, 2024 08:45 AM

पुणे - जेसीबी यंत्राखाली सापडून झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राहुल भुरेलाल जाधव (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार हेमंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून जेसीबी चालक मुकेश यादव (वय २७, रा. अष्टद्वार सोसायटी, धनकवडी) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील सोसायटीच्या परिसरात मागील महिन्यात बांधकाम सुरू होते. त्यावेळी मजूर राहुल जाधव जेसीबी यंत्राखाली झोपला होता. ही बाब जेसीबी चालकाच्या लक्षात आली नाही. त्याने राडारोडा उचलण्यासाठी जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट वरच्या बाजूला उचलली.

ती लोखंडी बकेट पुन्हा खाली जाधवच्या पोटावर आदळून तो गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस चौकशीत जेसीबी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता. ७) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.