अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जायला पुढील वर्षीचा सप्टेंबर महिना उजाडू शकतो. याआधी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जून-२०२५ची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनीच ही माहिती दिली.
अयोध्येत सध्या जवळपास दोनशे कामगारांचा तुटवडा असून पहिल्या मजल्यावरील काही दगड हलवावे लागणार असल्याने मंदिराच्या उभारणीची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. सध्या आम्हाला कामगारांचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला असून त्यामुळे बांधकामाला देखील विलंब होतो आहे असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
‘मंदिराभोवतीच्या सीमेवर भिंत उभारली जाणार असून त्यासाठी बन्सी पहाडपूर जातीचे विशेष दगड मागविण्यात आले आहेत. त्यांची व्याप्ती ही साधारणपणे ८.५ लाख घनफूट एवढी आहे. सध्या अयोध्येमध्ये मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याने कामाची गती देखील मंदावली आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील मोठे दगड हे कमकुवत पण काहीसे जाड आहेत त्यांच्या जागी आता टिकावू आणि मजबूत अशा माकराना जातीचे दगड बसविण्यात येतील,’’ असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
जागेचा शोध सुरू
मंदिर बांधकाम समितीची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मंदिराच्या आवारातील सर्व मूर्तीची उभारणी ही साधारणपणे या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रामलल्लाच्या आणखी दोन मूर्ती बसविण्यात येणार असून त्यासाठी जागेच्या निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.