वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातील काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद अद्याप दूर झालेले नसल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड लांबली आहे. त्यामुळे त्या राज्यातील विधानसभेच्या आगामी शीतकालीन अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याविनाच काँग्रेसला भाग घ्यावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 90 पैकी 48 जागा मिळवून विजयी झाला होता. त्यामुळे या पक्षाची सत्ता येथे असून काँग्रेसला 37 जागांसह विरोधी पक्षात बसावे लागले आहे. काँग्रेसचा पराभव अंतर्गत बंडाळीमुळे झाला असे काही तज्ञांचे मत असून ही बंडाळी अद्यापही शमलेली नाही.
काँग्रेसच्या हरियाणा शाखेत अनेक गट असून त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने अद्यापही विधीमंडळ पक्षनेत्याची निवड होऊ शकलेली नाही. काँग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता हाच विधानसभेतील विरोधी पक्षनेता असेल. पण या महत्वाच्या पदावर कोणाची निवड करावी, या संभ्रमात काँग्रेस असल्याने हे पद रिकामे आहे. परिणामी, आगामी शीतकालीन अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंग हु•ा हे विरोधी पक्षनेते होते.
सलग तीनदा सत्तेचा विक्रम
या राज्यात भारतीय जनता पक्षाने सलग तीनदा सत्तेवर येण्याचा विक्रम केला आहे. 1970 मध्ये हरियाणा राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आजवर कोणत्याही पक्षाला येथे सलग तीनदा सत्तेवर येण्याची संधी मतदारांनी दिलेली नाही. तथापि, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हा विक्रम करुन दाखविला आहे. काँग्रेसमध्ये मात्र, अद्यापही मतभेद कायम आहेत.
अंतर्गत वादांमुळेच
पक्षांतर्गत वादांमुळेच काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाही, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. मात्र, पक्षाने या आरोपाचा इन्कार केला आहे. हु•ा आणि कुमारी सेलजा या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये अद्यापही धुसफूस सुरु आहे. काँग्रेसला सत्ता मिळविण्यात अपशय आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांच्या विविध गटांमध्ये संघर्ष होत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.