मी परिवाराच्या आड कधी राजकारण आणलं नाही मात्र... राज ठाकरेंनी 'ती' खदखद बोलून दाखवली!
esakal November 11, 2024 08:45 AM

माझी पण व्यंग चित्रकार म्हणून मार्मिकमधून सुरूवात झाली. मी तेव्हा शाळेत होतो. लहानपणापासून मला राजकारण महाराष्ट्र समजायला लागलं. १९८५ साली बाळासाहेबांनी व्यंग चित्र काढणं बंद केलं आणि जबाबदारी माझ्यावर आली. मग सामना आला आणि त्यात मी व्यंग चित्र काढायला लागलो. दादर, माहीम, प्रभादेवी मतदारसंघात मार्मिक सामना आणि शिवसेनेची सुरूवात झाली. तिथे अनेक लोकांना शिवसेनेने निवडून आणलं. या सगळ्याची ही मूळ भूमी आहे. आज पहिल्यांदा घडतंय की इथे एक ठाकरे उभा राहतोय, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. ते आज प्रभादेवीमधील सभेत बोलत होते.

मनसेने आज प्रभादेवीमध्ये सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंची उपस्थिती होती. अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक उमेदवारासाठी मी सभा घेत आहे. २००६ ला मी शिवसेनेतून बाहेर पडलो. तेव्हा मी म्हणालो होतो माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही त्याच्या भोवतीच्या बडव्यांशी आहे. तेव्हा देखील आमदार माझ्यासोबत यायला तयार होते. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. बाळासाहेबांनी मला शेवटची मिठी मारली आणि मला म्हणाले जा. मला तो पक्ष फोडून काही करायचं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, उद्धव आजारी पडला तेव्हा मी गाडी घेऊन स्वतः तिथे गेलो होतो. मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. आदित्य जेव्हा उभा होता तेव्हा मी उमेदवार दिला नव्हता. ३७-३८ हजार आमचे मतदार नाहीत. मी काही कोणाला फोन केला नव्हता की, मी उमेदवार दिला नव्हता तर तुम्हीही देऊ नका. आज देखील अमित उभा आहे मी भीक नाही मागणार. आमच्या दोघांच्या मनात नव्हतं. मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उमेदवार द्या नाही तर नका देऊ. मी माझा उमेदवार निवडून नक्की आणणार, असं म्हणत राज ठाकरे गरजले आहेत.

नेत्यांच्या बैठकीत नेते म्हणाले अमितला भांडूपमधून उभं करू. मग अमितसोबत मी आणि शर्मिला बसलो. अमित ठाकरे उभं राहायला तयार होता त्याची इच्छा होती हे लक्षात आलं. मला कधी वाटलं नाही निवडणुकीला उभ राहावं. १९७४ साली तेव्हाचे महापौर सुधीर जोशी अचानक कार्यालयात आले. तेव्हा बाळासाहेबांनी दिव्याच्या गाडीत बसण्यात नकार दिला आणि आम्ही टॅक्सीतून निघालो. तेव्हा वांद्रे पुलावर मागे बघितलं तेव्हा टॅक्सीपाठी लाल दिव्याची गाडी होती. त्यामुळे मला कधीच लाल दिव्याच अप्रूप वाटलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, इथल्या सगळ्या उमेदवारांची मी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो. मला जो महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी तडफदार लोक मला हवीत. ज्यांच्यात आग असेल. अमित राज ठाकरे असं जरी नाव असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. तुमचा एक नंबर तुम्ही सार्वजनिक करायला पाहिजे तुम्ही किंवा तुमचा एक माणूस सदैव हजर हवा.

जो कोणाचंच नाही झाला त्याबद्दल काय बोलायचं. बाळासाहेब असताना हा काँग्रेसमध्ये गेला. पडले मग परत आले आणि त्यानंतर शिंदे बरोबर गेले,असं राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांच्यावर म्हटलं आहे. दुसरे उमेदवार देखील बाळासाहेब असताना शिवसेना सोडून काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक साठी उभे होते. मी ठरवलं होत कोणाच्या खाली काम करणार नाही. माझी महाराष्ट्रासाठी अनेक स्वप्न आहे मला महाराष्ट्र घडवायचा आहे, असं महेश सावंतांसाठी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राने हिंद प्रांतावर राज केलं. मात्र आत्ता कोणाचा कोणावर विश्वास नाही अशी परिस्थिती आली आहे. म्हणून २०२४ साली नवीन उमेदीची पोटात आग असलेली माणसं तुमच्या समोर आणत आहे. माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.