सोलापूर : सकाळी साडेसातची वेळ...चहा कॅन्टिन, नाश्ता सेंटरवर सगळीकडे लोकांची गर्दीच गर्दी...शहर उत्तर मतदारसंघातील अनेक भागात पुढे पुढे गेल्यावर अनेकांच्या तोंडी एकच बात, ती म्हणजे निवडून कोण येणार... सम्राट चौकातून हनुमान नगर, भवानी पेठ, प्रियांका चौक, घोंगडे वस्ती, तुळजापूर वेस, मराठा वस्ती, बाळीवेस, पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, कुंभार वेस, जोडभावी पेठ, रविवार पेठ, कन्ना चौक अशा भागातील लोकांचा अंदाज घेतला. त्यावेळी ठिकठिकाणी गप्पा मारणाऱ्यांचा एकच विषय, तो म्हणजे निवडणुकीत काय होणार?
लाडकी बहीणसह इतर योजनांचा लाभ मिळालेले आनंदी तर न मिळालेले नाराज, वर्तमानपत्र वाचत अंदाज बांधणे व मी सांगतोय तोच कसा निवडून येईल हे याची खात्री देत रंगलेल्या गप्पा हेच चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. दुसरीकडे समोर टोपली ठेवून विडी वळणाऱ्या महिला म्हणाल्या, दोन-तीन पिढ्या विड्या वळण्यातच गेल्या, आता मुलाबाळांना मोफत व चांगले शिक्षण, नोकरी मिळावी एवढीच अपेक्षा आहे. एकंदरीत २० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील यंदाची निवडणूक घासून होईल हे निश्चित.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात २० वर्षांपासून भाजपचे विजयकुमार देशमुख आमदार आहेत. आजही त्यांच्यावर अनेक मतदारांचा विश्वास आहे. या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील मागासवर्गीय, विडी कामगार व व्यावसायिकांचे मतदान निर्णायक आहे. रिक्षा चालकांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हे घटक ज्यांच्यासोबत तोच आमदार असे येथील समीकरण.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील नागरिक प्यायला नियमित पाणी नाही, मुख्य रस्ता चकाचक पण अंतर्गत रस्ते अत्यंत खराब, बेघरांना घरकुलाचा लाभ नाही, सगळीकडे अस्वच्छता, बाजारपेठांमध्ये पार्किंगची सोय नाही, विडी उद्योगाला संरक्षण नाही व कामगारांना कामाचा रास्त मोबदला मिळत नाही, अशा प्रमुख कारणांमुळे नाराज असल्याचे दिसून आले. तरीपण, यंदा विजय कोणाचा होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. मात्र, नेत्यांवरील प्रेमापोटी त्या त्या पक्षांचे विविध परिसरातील लोक आमचाच उमेदवार आमदार होणार असेही ठासून सांगत होते. मतदारसंघातील अनेक भागात माजी महापौर शोभा बनशेट्टींना मानणारा वर्ग आहे. पण, मतदारसंघात अजूनही अनेकांच्या तोंडी विद्यमान आमदारांचाच बोलबाला असला तरी परिवर्तनाच्या गप्पा मारणारेही मतदार या भागात दिसून आले.
‘या’ भागाचा आढावा
सम्राट चौक, हनुमान नगर, भवानी पेठ, प्रियांका चौक, घोंगडे वस्ती, तुळजापूर वेस, मराठा वस्ती, बाळीवेस, पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, कुंभार वेस, जोडभावी पेठ, रविवार पेठ, कन्ना चौक, राजेंद्र चौक, भद्रावती पेठ, कुंचीकोरवी झोपडपट्टी (मार्कंडेय रुग्णालयाशेजारी), दत्त नगर, भद्रावती चौक, दाजी पेठ, शेळगी, विडी घरकुल या परिसरातील स्थिती जाणून घेतली. त्यावेळी या भागात अजूनही ना पक्के अंतर्गत रस्ते ना पिण्यासाठी नियमित पाणी, अशा समस्या दिसून आल्या.
शहर उत्तर मतदारसंघाबद्दल थोडक्यात...
चाटी गल्ली, सराफ बाजार, मंगळवार पेठ, भवानी पेठ अशा ठिकाणचे व्यापारी म्हणाले, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावा, ग्राहकांसाठी बाजारपेठेजवळ पार्किंगची सेाय असावी, आम्ही आमच्याही गाड्या आत आणू शकत नाही अशी परिस्थिती परिस्थिती आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
मतदारसंघात रिक्षा चालकांची संख्या मोठी आहे. सम्राट चौक, बाळीवेस, कन्ना चौक, भद्रावती पेठ याठिकाणी थांबलेले रिक्षाचालक म्हणाले, रिक्षा थांबे वाढवावेत व कल्याणकारी महामंडळाकडून ५० टक्के सबसिडीतून कर्ज मिळावे.
घोंगडे वस्ती, तुळजापूर वेस, मराठा वस्ती, बाळीवेस, पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, कुंभार वेस, जोडभावी पेठ, रविवार पेठ, कन्ना चौक या भागात रविवारी (ता. १०) पाणी आल्याने बहुतेक महिला पाणी भरण्यात मग्न होत्या. किमान एक दिवसाआड पाणी मिळावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे.