येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धडाका सुरूये. अशातच मुंबईतील बांद्रा येथील मातोश्री परिसरात महायुतीने जोरदार बॅनरबाजी केली आहे. महायुतीकडून करण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे एका साईडला फोटो तर दुसऱ्या साईडला अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो दिसताय. त्या फोटोंच्या खालोखालच “होय पुन्हा महायुतीचंच सरकार येणार” असा दावा करण्यात आलाय. मातोश्रीच्या बाहेर लागलेल्या बॅनरवर सरकारने केलेल्या कामाचा हवालाही दिला गेला आहे. केलंय काम भारी, आता पुढची तयारी, असं म्हणत थेट उद्धव ठाकरे गट शिवसेनेला डिवचण्याचं काम या बॅनरच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा सध्या मातोश्री परिसरात सुरू आहे. ‘वयोश्री योजनेसह तीर्थदर्शन योजनेचा आधार… जेष्ठांची मायेनं काळजी घेणार… विकासाचं निशाण म्हणजे लाडकं धनुष्यबाण’ असं म्हणत महायुतीकडून मातोश्री बाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून मतदारांना महायुतीतील शिवसेनेला मतं देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.