स्पर्धा परीक्षेसह इतर कोणत्याही महत्त्वाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चांगले वाचन असणे फार महत्त्वाचे असते. वाचन करणे म्हणजे एकामागून एक पान उलटवत पुस्तकाचा फडशा पाडणे नाही. असे केल्याने पुस्तक संपल्यावर शेवटी काहीच लक्षात राहत नाही.
पुस्तकाचे वाचन झाल्यावर त्यातील महत्त्वाचे मुद्दे, संदर्भ लक्षात राहायला हवेत, तरच त्यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करता येतो. यासाठी वाचन करताना खालील टिप्स लक्षात ठेवा -
शांतपणे वाचा
वाचन शांतपणे करा. पटकन वाचून पुस्तक संपवण्याच्या मागे लागू नका. वाचताना लेखकाची शैली, नवीन शब्दांचा वापर, शब्दयोजना, स्थळ-काळांचे उल्लेख हे सर्व टिपून घ्या. यासाठी शांतपणे वाचा. वाचताना पूर्ण लक्ष वाचनावरच केंद्रित करा. गाणी ऐकत, गप्पा मारत किंवा जेवण करत वाचू नका. त्यामुळे मग एकाग्र होण्यास अडथळे निर्माण होतात.
नोंदवही
जी माहिती नवीन वाटेल, वेगळी वाटेल किंवा त्यावर आधारित आणखी संशोधन करणं आवश्यक वाटेल अशी माहिती एखाद्या नोंदवहीत टिपून ठेवा. वाचताना एखादा मुद्दा लक्षात न आल्यास तोही त्याच नोंदवहीत लिहा, नंतर त्यावर सविस्तर चर्चा करा. एखाद्या विषयाच्या पक्क्या नोट्स तयार करताना या नोंदवहीचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो.
संदर्भाचा शोध
अभ्यासक्रमाच्या किंवा अवांतर पुस्तकात एखादा नवीन संदर्भ सापडल्यास त्याकडे केवळ नवी नाहिती म्हणून पाहू नका. त्या संदर्भाचा मुळातून शोध घ्या. त्यासाठी संदर्भग्रंथांची मदत घ्या. अत्यंत आवश्यक असलेले संदर्भग्रंथ शक्य झाल्यास विकत घ्या. त्यामुळे तुम्हाला त्यांची सतत मदत होईल. संदर्भग्रंथ वापरण्याची पद्धत शिकून घ्या. त्यासाठी गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
अधोरेखित करा
पुस्तकात असलेली महत्त्वाची नावे, स्थळ, घटना, दिनांक, वार, परिमाणे, आकडेवारी वगैरे अधोरेखित करण्याची सवय लावा. त्यासाठी मार्कर पेन वापरा. त्यामुळे पुस्तक चाळतानादेखील उजळणी करणे सोपे जाते. शोधाशोध करावी लागत नाही. अधोरेखित मुद्दे नोट्स काढताना सहजपणे मिळतात.
चर्चा
आपण काय वाचलं? त्यातून काय मिळालं? काय चांगलं वाटलं? कोणता भाग अनावश्यक वाटला? लेखकाची शैली कशी वाटली? अशा विविध मुद्द्यांवर आपल्या मित्रांशी, घरातील मंडळींशी, शिक्षकांशी चर्चा करा.
त्यामुळे तुमचे वाचन केवळ तुमच्यापुरता मर्यादित न राहता ते इतरांपर्यंत पोहोचतं. तसेच, इतर लोकही तुमच्याही वाचनावर, पुस्तकांवर बोलू लागतात. त्यामुळे तुम्हाला नवीन माहिती मिळते. समविचारी मंडळींचा एखादा ग्रुप तयार होतो. त्यातून चांगला अभ्यासही होतो.
बहुभाषिक व्हा!
कोणत्याही एकाच भाषेत अडकून राहू नका. केवळ मराठी किंवा केवळ इंग्रजी वाचू नका. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये वाचनाचा सराव सुरू ठेवा. प्रमाण कमी-जास्त असू शकते. मात्र, केवळ एकच भाषा धरून ठेवू नका. नवी भाषा म्हणजे नवीन संस्कृती असते. तिला इतिहास, भूगोल चिकटलेला असतो.
माणसांची विविध रूपे, त्यांचं बोलणं, माहिती असा खूप मोठा परीघ प्रत्येक भाषेत असतो. त्यामुळे आपला परीघ विस्तारण्यासाठी भाषेचं बंधन ठेवू नका. त्याचप्रमाणे साहित्याच्या कोणत्याही एका प्रकारत किंवा कोणत्याही एका लेखकाच्या लेखनात स्वतःला अडकवून घेऊ नका. जे जे मिळेल, ते ते स्वतः वाचून मगच त्याचं परीक्षण करा.
सतत स्क्रीन नको
वाचन करताना दर वेळी ई-बुक किंवा पीडीएफ वापरू नका. यामुळे डोळ्यांवर ताण येतो, तसेच मूळ पुस्तकातील माहिती किंवा एखादे प्रकरण ‘फ्री पीडीएफ’मध्ये गाळलेले असते. त्यामुळे मूळ पुस्तकच वाचा. रस्त्यावर स्वस्तात मिळणारी पुस्तके (पायरटेड) विकत घेऊ नका. तो कायद्याने गुन्हा आहे. वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी ते योग्य नाही.
चिंतन
वाचनाच्या पुढची पायरी चिंतनाची असते. त्यामुळे वाचलेलं सगळं केवळ डोळ्यांखालून गेलं असं होऊ न देता त्यातलं आपल्याला किती कळलं? किती समजलं? काय समजलंच नाही? याचं स्वतःशी चिंतन करा. त्यातून जे जाणवेल ते लिहून काढा. या सर्व प्रक्रियेमुळे दिवसेंदिवस आपण समृद्ध होत आहोत, असं तुम्हाला नक्कीच जाणवेल!