Savita Malpekar : मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून रंजना (Ranjana Deshmukh) यांचं नाव कायमच घेतलं जात. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ रंजना या नावाने गाजला आहे, याची आठवण आजही केली जाते. पण कलासृष्टी म्हटलं की, कलाकारांमध्ये स्पर्धा ही येतेच. असंच रंजना यांच्या काळातही व्हायचं. त्याचविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar ) यांनी रंजना यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रंजनामुळे मला सिनेमातून काढून टाकलं असल्याचं सविता मालपेकरांनी म्हटलं. सविता मालपेकर आणि रंजना या केवळ एकाच सिनेमात एकत्र दिसल्या आहेत. पण त्यानंतर कधीच एकत्र काम का केलं नाही? या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी तो किस्सा सांगितला आहे.
तो सिनेमा भुजबळ साहेबांचा पहिला सिनेमा होता. त्यावेळी ते महापौर होते. कुलदीप पवार आणि भारतमाताचे विनायक सरस्वते त्या सिनेमात होते. माझं त्या सिनेमाच नक्की झालं कुलदीपच्या अपोझिट मी आणि रंजना-अशोक. कुलदीप मला भारतमाताला सरस्वतेंकडे घेऊन गेला, तिथेच भुजबळ साहेबांचे सेक्रेटरी वैगरे आले, सायनिंग अमाऊंट वैगरे दिली. तेव्हा 3 हजार रुपये सायनिंग अमाऊंट मला मिळाली होती. मी खूश होते, सिनेमात काम करायला मिळणार होतं, सेकंड लीड होती. त्यातच त्याचं शुटींग राजापूरच्या इथे लांजा गाव होतं तिथे होतं,त्यामुळे मी आणखीनच खूश होते.
पुढे त्यांनी म्हटलं की, बरं मला नाचता येतं की नाही, हे सगळं पाहिलं होतं. फायनल झालं होतं. ब्लाऊजही शिवून झाले होते. फक्त साड्या राहिल्या होत्या. मला फोन येत नाही अजून म्हणून मी फोन केला. तेव्हा मला कळालं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाटीयाला आणलं होतं.ही रिप्लेसमेंट रंजनाने केली होती. त्यावेळी ती हे करायची. आता असं बोलू नये पण त्यावेळी ती बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी करायची. कदाचित तिला काही वेगळं वाटलं असेल. मला शेवटपर्यंत त्या सिनेमातून रिप्लेस करण्याचं कारण नव्हतं.