10 राज्यांमध्ये पोटनिवडणूक : वायनाडमध्ये प्रियांका वड्रा विरोधात भाजपच्या नव्या हरिदास
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
झारखंडच्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसोबत 10 राज्यांच्या 31 विधानसभा आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सिक्कीमच्या 2 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रियांका वड्रा उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात भाजपच्या नव्या हरिदास आणि डाव्या आघाडीचे सत्यन मोकेरी हे निवडणूक मैदानात आहेत.
10 राज्यांच्या 31 विधानसभा मतदारसंघांपैकी 28 आमदार हे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने तर 2 आमदारांचे निधन झाल्याने आणि एकाच्या पक्षांतरामुळे पोटनिवडणूक होत आहे. यातील 4 जागा अनुसूचित जाती आणि 6 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या 31 पैकी 18 जागा या भाजपच्या विरोधी पक्षांनी जिंकल्या होत्या. काँग्रेसकडे यातील 9 जागा होत्या. तर रालोआने 11 जागा जिंकल्या होत्या. यातील 7 आमदार भाजपचे होते.
राजस्थानात 7 जागांकरता पोटनिवडणूक
राजस्थानात 7 जागांकरता पोटनिवडणूक होत आहे. यातील केवळ सलंबूर मतदारसंघात अमृतलाल मीणा हे भाजपचे आमदार होते. उर्वरित 4 जगांवर काँग्रेस तर एका जागेवर भारतीय आदिवासी पक्ष आणि एका जागेवर हनुमान बेनीवाल यांच्या रालोपचा आमदार होता. पोटनिवडणूक हा राज्यातील भजनलाल शर्मा सरकारची पहिली परीक्षा ठरणार आहे. हा निकाल विरोधात गेला तर भजनलाल शर्मा यांच्यासमोर राजकीय संकट उभे ठाकणार असल्याचे मानले जात आहे.
बिहारमध्ये विधानसभेची सेमीफायनल
बिहारच्या 4 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीला 2025 च्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानले जात आहे. या 4 पैकी 3 जागांवर महाआघाडीचा कब्जा होता. लोकसभा निवडणुकीप्रमाणे पोटनिवडणुकीत लोक कामाच्या आधारावर मतदान करतील असा विश्वास नितीश कुमारांना आहे. तर राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाकरता पोटनिवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मतदार त्यांना कितपत साथ देतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शिवराज यांची प्रतिष्ठा पणाला
मध्यप्रदेशातील दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचे ठरले आहेत. बुधनी हा शिवराज सिंह चौहान यांचा मतदारसंघ आहे. 2006-23 या कालावधत ते सलग येथू निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर शिवराज यांनी बुधनी मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. यामुळे बुधनीतील पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आहे. विजयपूर मतदारसंघात राज्याचे वनमंत्री रामनिवास रावत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार
छत्तीसगडच्या रायपूर दक्षिण मतदारसंघात भाजपने जोरदार प्रचार केला आहे. बृजमोहन अग्रवाल हे खासदार म्हणून निवडून आल्याने हा मतदारसंघ रिक्त झाला होता. याठिकाणी भाजपने माजी महापौर सुनील सोनी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने युवा नेते आकाश शर्मा यांना मैदानात उतरविले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममतांची प्रतिष्ठा पणाला
पश्चिम बंगालमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ हे आमदार खासदार म्हणून निवडून आल्याने रिक्त झाले होते. यातील केवळ मदारीहाट मतदारसंघात मनोज टिग्गा हे भाजपचे आमदार होते. उर्वरित सर्व ठिकाणी तृणमूल काँग्रेसचाच कब्जा होता. ही पोटनिवडणूक राज्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने तृणमूल काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहे. पोटनिवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो.
आसाममध्ये घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत
आसाममध्ये बोंगाईगाव मतदारसंघात आसाम गण परिषदेच्या वतीने भूषण चौधरी यांच्या पत्नी दीप्तिमयी पोटनिवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसने धुबरीचे खासदार रकीबुल हुसैन यांचे पुत्र तंजील यांना सामागुडी मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी तंजील यांच्या उमेदवारीवर टिप्पणी करत काँग्रेस घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात पोटनिवडणूक होत असलेल्या 5 पैकी चार जागांवर रालोआचा कब्जा होता. तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार होता.
गुजरातमध्ये एका जागेकरता पोटनिवडणूक
गुजरात विधानसभेच्या दोन जागा रिक्त असल्या तरीही एकाच जागेकरता पोटनिवडणूक होत आहे. वाव मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार गिनीबेन ठाकोर या बनासकांठाच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर विसावदरचे आप आमदार भूपत भायाणी यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याप्रकरणी काही याचिका न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने तेथे पोटनिवडणूक होणार नाही.
मेघालयात एका जागेकरता पोटनिवडणूक
काँग्रेस आमदार सलेंग ए संगमा हे खासदार म्हणून निवडून आल्याने मेघालयातील गाम्ब्रेग्रे मतदारसंघ रिक्त झाला आहे. पक्षाने या ठिकाणी जिंगजांग मराक यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने बर्नार्ड मारक यांना उमेदवारी दिली आहे.
प्रियांका वड्रांची पहिली निवडणूक
केरळ विधानसभेच्या चेलाक्कारासोबत वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. चेलाक्काराचे माकप आमदार के. राधाकृष्णन हे अलाथुरचे खासदार म्हणून निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने येथे राम्या हरिदास तर भाजपने के. बालकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका वड्रा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.