Maharashtra Weather : कुठे हुडहुडी तर कुठे मुसळधार पाऊस; वाचा हवामानाचा आजचा अंदाज
Saam TV November 14, 2024 01:45 PM

Maharashtra weather update News in Marathi : राज्यातील तापमानाचा पारा वेगानं घसरतोय, त्यामुळे थंडीची चाहील लागली आहे. काही ठिकाणी हुडहुडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. कोकण वगळता उर्वरित भागात तापमानाचा पारा अतिशय वेगाने खाली येण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा १८ अंशाच्या खाली आलेला आहे. रात्री हवेत गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. (Weather Forecast News in Marathi)

थंडी वाढल्यामुळे कपाटात ठेवलेले गरम कपडे आणि स्वेटर निघण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात आता शेकोट्याही पेटायला लागतील. ऐकूणच काय तर राज्यात आठवडाभरात पूर्णपणे थंडी पसरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेर राज्यभरात गुलाबी थंडीची चादर पसरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात अेक भागातील तापमान १८ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेय. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी पडली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणाचा पारा ११ अंशापर्यंत घसरल्याचं निदर्शनास आलेय. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे, पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवलाय. दक्षिण महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण राहिली. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनासह जोरदार पावसाची शक्यता( Maharashtra Rain Alert ) हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाचा अंदाज कुठे कुठे ?

कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम -

राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. कोकणात मात्र कमाल तापमान अद्याप ३५ अंशापेक्षा जास्त आहे. पुढील काही दिवसांत या तापमानात घसरण होऊ शकते, असा अंदाज आहे. बुधवारी निफाडमधील तापमान ११ .८ अंशावर पोहचले होते, तर डहाणू येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान १५ अंश आणि त्यापेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.