World Diabetes Day 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याला कारणीभूत व्यायमाचा अभाव, फास्ट फूड , लठ्ठपणा, आणि आनुवंशिकता यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मधुमेहाचे मुख्य २ प्रकार आहेत. टाइप १ डायबेटिस आणि टाइप २ डायबेटिस.
टाइप १ मधुमेह हा मुख्यतः लहान मुलांमध्ये आधळून येतो आणि टाइप २ मधुमेह हा प्रौढ वयात दिसून येतो. पण हल्ली कमी वयामध्ये पण टाइप २ मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) २००८ ते २०२० या कालावधीत एक सर्वे केला आहे, ज्यामध्ये २८ राज्ये आणि केद्रशासित प्रदेशातील १,१३,०४३ लोकांचा समावेश होता. या सर्वेनुसार भारतात सध्या १०.१ कोटी लोकांना मधुमेह आहे आणि १३.६ कोटी लोकांना Prediabetes ( पूर्वमधुमेह) आहे.
कोरोनानंतर मधुमेहात वाढ
कोरोनाच्या संक्रमणानंतर मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. कोविड उपचारांतील स्टेरॉइड्सचा वापर, शारीरिक हालचालीचा अभाव, आणि तणावामुळे मधुमेहाचा धोका वाढला आहे
मधुमेहाचं सूत्र: साखर, इन्सुलिन आणि शरीराची ताळमेळ!
मधुमेह म्हणजे शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा प्रतिकार. आपल्या शरीरातील स्वादुपिंड मधील बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. पण टाईप १ मध्ये या बीटा पेशी नष्ट होतात, तर टाईप २ मध्ये इन्सुलिन असलं तरी ते प्रभावी राहत नाही. ज्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते.
दुर्लक्ष केल्यास आरोग्यासाठी घातक
मधुमेह हा एक “सायलेंट किलर” आहे. कारण त्याचे परिणाम सुरुवातीला दिसत नाहीत, परंतु नंतर शरीराच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. अनियंत्रित मधुमेहामुळे नेफ्रोपॅथी (मूत्रपिंडाचे आजार), रेटिनोपॅथी (डोळ्यांचे आजार), न्युरोपॅथी (नसांचे आजार), आणि हृदयविकार यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय, मधुमेहामुळे स्ट्रोक आणि पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखर, रक्तदाब, आणि कोलेस्टेरॉल तपासणे आवश्यक आहे.
योग्य आहार
अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या (ADA) मते, मधुमेह असलेल्या सुमारे २५% लोकांना नैराश्याचा त्रास होतो, आणि ४०% लोकांना तणाव जाणवतो. अशावेळी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तणाव आणि नैराश्यामुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवणे अवघड होते.
मधुमेह उपचारामध्ये रुग्णाच्या मनाचा आणि समाजाचा मोठा वाटा असतो. साखर नियंत्रणात ठेवणे हे एकवेळ सोपं आहे. पण तणाव आणि चिंता सांभाळणं हे कठीण आहे. अशा वेळी घरचे लोक आणि मित्रांचे पाठबळ खूप उपयोगी ठरते. यामुळे रुग्णाला मानसिक आधार मिळतो आणि मधुमेह नियंत्रात ठेवणे सोयीस्कर जाते.
मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवाल
संपूर्ण धान्य, कडधान्य, तंतुमय पदार्थ, डाळी यांचे सेवन करावे.
पालेभाज्या, कमी गोड असलेले फळ यांचे सेवन करावे.
मासे, अंडी यांचे सेवन टाळावे.
तेलकट, गोड पदार्थ खाणे टाळावे.
चालणे गरजेचे
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस, रोज ३० मिनिटं तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. चालणं, सायकलिंग, किंवा योगासारखे हलके व्यायामसुद्धा पुरेसे असतात. या साध्या सवयींनी शरीरातली साखर नियंत्रणात राहते, इन्सुलिन चांगलं काम करतं, वजन कमी होतं, आणि मन आनंदी राहतं, ज्याचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
नवी औषधं आणि संशोधन
टाइप २ मधुमेहासाठी Metformin, Sulfonylureas (उदा. Glimeperide, Gliclazide), DPP-4 Inhibitors (उदा. Sitagliptin, Linagliptin), आणि SGLT-2 Inhibitors (उदा. Empagliflozin, Dapagliflozin) या औषधांचा वापर डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.
मधुमेहाच्या उपचारात सतत नवीन औषधं येत आहेत, जसे की GLP-1 अगोनिस्ट (Semaglutide, Liraglutide) ज्यामुळे वजन कमी करण्यास आणि साखर नियंत्रणात मदत होते. यासोबतच, बीटा पेशी ट्रान्सप्लांटचा शोध चालू आहे, ज्यामुळे भविष्यात मधुमेहाचं उपचारक्रम बदलू शकतो
इन्सुलिनचं महत्त्व आणि त्याविषयीची भीती:
"इन्सुलिन सुरु केलं की पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे जातो," असं म्हणतात. पण जेव्हा गरज असते, तेव्हा इन्सुलिन अत्यंत गरजेचं असतं. नवीन पेन डिव्हाइसेसमुळे इन्सुलिन घेणं आता सोपं, वेदनारहित झालं आहे. लोकांमध्ये इन्सुलिनबद्दलचा गैरसमज दूर करणं आवश्यक आहे, कारण इन्सुलिनमुळे मधुमेहाचं योग्य नियंत्रण मिळवता येतं. टाइप १ मधुमेहामध्ये इन्सुलिन आजीवन आवश्यक असतं, कारण शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही. मात्र, टाइप २ मधुमेहात सुरुवातीला औषधं चालू असली तरी, जर साखर नियंत्रणात नसेल तर इन्सुलिनची गरज भासू शकते.
डॉ अक्षय नारायण अंबेकर एमबीबीएस, एमडी (जनरल मेडिसिन) SR Endocrinology (डायबेटिस आणि हार्मोन तज्ञ)