मुंबई : भारतीय राजकारणात ‘वॉर रूम ही संकल्पना रुजवली ती भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थानी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी. त्यापूर्वी पक्षांच्या कार्यालयांमधून निवडणुकांची कामे चालायची. पण त्याचे स्वरूप अशा स्वरूपाचे ‘हायफाय’ नसायचे. नरेंद्र मोदी यांचा भारतीय राजकारणाच्या पटलावर २०१४ मध्ये महाप्रवेश झाला तेव्हा ‘चाय पे चर्चा’, ‘गुड गव्हर्नन्स’ अशा कित्येक आयुधांचा वापर करत त्यांनी ‘वॉर रूम ही संकल्पना दृढ केली .दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘डून स्कूल’ मित्रांच्या काळात या धर्तीचे प्रयत्न झाले होते. पण निवडणूक जिंकण्यासाठी संख्याशास्त्राचा मतदारसंघनिहाय अभ्यास करून त्याचा वापर करण्याचे श्रेय भाजपकडे जाते.
सध्या भारतीय जनता पक्षाकडे अत्याधुनिक ‘वॉर रूमची संकल्पना रुजवली जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक देशाचे ‘नॅरेटीव्ह’ काय आहे हे सांगणारी असेल याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्रिस्तरीय ‘वॉर रूम तयार करण्यात आली आहे. तिन्ही पातळीवर काम करणाऱ्यांना दिल्लीतून सातत्याने माहिती पुरवली जात असते. त्या माहितीचे संकलन राज्यात नेमलेले काही प्रगणक करत असतात. पण दिशा देण्याचे काम मात्र दिल्ली-मुंबईतील काही महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलूनच चालते. भाजपची ‘वॉर रूम’ सतत दक्ष असते. २० नोव्हेंबरपर्यंत रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे, असे सांगितले जात आहे.
त्रिस्तरिय विभागणी
तीनस्तरिय ‘वॉर रूमच्या कामाची विभागणी स्पष्ट आहे. प्रत्येक उमेदवारासाठी काम करणारे हे रचनेतील सर्वांत तळातील पण महत्त्वाचा विभाग. मतदार यादीतील प्रत्येकाशी संपर्क ठेवणे, त्याला भाजपच्या योजनांची माहिती देणे, त्याचा किंवा तिचा बूथ कोणत्या केंद्रात येतो, तेथे मतदानाची चिठ्ठी मिळाली का?, हे विचारणे, मतदानात काही अडचणी आहेत का?, नाव गळाले आहे काय हे पाहणे अशी कामे हा विभाग करतो. मुंबईत या विभागाचे महत्त्वाचे केंद्र असले तरी नागपूर, पुणे, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा भागांमध्ये या कार्यालयाची छोटी केंद्रे आहेत. तेथून निवडणूक वहनाचे काम अत्यंत व्यवस्थितपणे होत असते. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे यावेळी येथे डोळ्यात तेल घालून हे काम केले जात आहे.
मतदारांना जोडणारे माध्यम केंद्र
दुसरे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे ते ‘मीडिया सेंटर’ (माध्यम केंद्र). पक्षाच्या परंपरागत आणि अन्य मतदारांपर्यंत सर्व माहिती पुरविण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणून ‘मीडिया सेंटर’ काम करते. या केंद्राचीही भाजपने द्विस्तरीय विभागणी केली आहे. एक आहे ती परंपरागत माध्यमांशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि दुसरे आहे ती डिजिटल, सोशल मीडिया अशा तंत्रस्नेही नव्या पिढीकडे लक्ष देण्यासाठी तयार केलेले केंद्र. या दोन्ही केंद्रात मिळून सुमारे ३० लोक सध्या काम करीत आहेत. यातील काही लोक भारतीय जनता पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वेक्षण संस्थांचे आहेत तर काही पक्षासाठी काम करणारे प्रारंभापासूनचे कार्यकर्ते आहेत.यात काही पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा समावेशही आहे. यावेळी संघ परिवाराशी संपर्क ठेवून हे काम केले जाते आहे.
स्थानाबाबत गोपनीयता
‘वॉर रुम’चा पत्ता, ठावठिकाणा कुणीही कुणालाही सांगत नाही. या त्रिस्तरीय ‘वॉर रुम’मध्ये सुमारे १०० लोक काम करतात. अगदी छोट्या पातळीवर काम करणाऱ्यांना सात ते आठ हजार रुपये, मध्यम पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना १५ ते २० हजार रुपये तर नियोजनकार, रणनीती आखणाऱ्यांना लाखात पगार मिळतो.२५ टक्के मंडळी केवळ पक्षकार्य म्हणून काम करतात. ‘कुछ कर दिखाना है, लोकसभा का रुझान बदलना है’ या ध्येयाने काम केले जाते आहे .
नेत्यांना माहिती पुरवणारी यंत्रणा
तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे उपकेंद्र आहे ते नेत्यांना माहिती पुरवणाऱ्या यंत्रणेचे. प्रत्येक मतदारसंघात काय सुरू आहे यावर भारतीय जनता पक्षातर्फे लक्ष ठेवले जाते. राज्यातील २८८ मतदारसंघांमधून माहिती ‘वॉर रुम’मध्ये पोहोचते. तेथे काय सुरु आहे याचा आढावा घेऊन तशी माहिती उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना पाठवली जाते. त्यावर काय उत्तर द्यायचे ते ठरविले जाते. पत्रकार परिषदा, वर्तमानपत्रांची कात्रणे यांचे विश्लेषण करून ते उमेदवाराला पुरवले जाते. नेत्यांच्या सभांची मागणी लक्षात घेणे, त्या कुठे घेणे योग्य ठरेल याचा निर्णय घेणे, अशी अत्यंत महत्त्वाची कामे ‘वॉर रूम’ करते.
निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय पक्षांच्या कार्यालयात धामधूम सुरू होते. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती, मग त्यातून अंतिम उमेदवार जाहीर करणे, त्यांच्या प्रचार जाहिराती, मोठ्या नेत्यांच्या सभा, कोपरा बैठका, मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेणे, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. नेते आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. या पारंपरिक प्रचाराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून ‘स्मार्ट’ प्रचाराची वाटही अंगवळणी पडली आहे. ऑनलाइन प्रचारासाठी राजकीय पक्षांची ‘वॉर रूम’ सज्ज आहे. प्रमुख पक्षांच्या या अत्याधुनिक प्रचार कक्षाचे अंतरंग लेखांतून मांडण्यात येत आहेत.
मृणालिनी नानिवडेकर#ElectionWithSakal