Baba siddiqui case update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी शूटरला रविवारी अटक केली आहे. पोलिस तपासामध्ये एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम हा त्यांच्या मृत्यू झाल्याची खात्री करायला लीलावती रुग्णालयात गेला होता. तो जवळपास 30 मिनिटं लीलावती रुग्णालयाजवळच होता. बाबा सिद्दिकी यांची तब्बेत अत्यंत चिंताजनक असून वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतरच शिवकुमार गौतम तिथून रवाना झाला. पोलिस तपासामध्ये ही माहिती पुढे आली आहे.
आरोपी शिवकुमार हा त्यानंतर रिक्षाने तो कुर्ल्याला गेला. तिथून ठाण्याला ट्रेनने गेला आणि ठाण्यावरून एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाला होता. मोबाईलवरील बातम्यांमधून त्याला बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.
घटनास्थळी होता २० मिनिटंएवढंच नाही तर गोळीबारानंतर शिवकुमारने त्याचा शर्ट बदलला होता आणि घटनास्थळीदेखील तो जवळपास २० मिनिटे तमाशा बघत होता. प्लॅनिंगनुसार शिवकुमार हा धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह या दोघा शूटरना उज्जैन रेल्वे स्थानकात भेटणार होता जिथे बिश्नोईची माणसं त्यांना वैष्णव देवीला नेणार होते. मात्र दोघेही घटनास्थळी पकडले गेले. रविवारी यूपी STF च्या मदतीने उत्तर प्रदेशच्या बेहराईचवरून शिवकुमारला अटक केली होती.
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश STF ने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी शूटर शिवकुमार याला संयुक्तरित्या अटक केली होती. शिवकुमारसह दोघा जणांना गुन्हे शाखेने अटक केली. उत्तर प्रदेशच्या बेहाराईच येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती.