डोंबिवली - कल्याण ग्रामीण मध्ये भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना तडीपार करण्यात आले आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा प्रचार ते करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. यावर आता आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, काल गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता. संदीप माळी माझा मित्र आहे. माझे नातेवाईक आहेत. प्रत्येक निवडणूकित कोणी काही पक्ष बघत नाही. त्यांच्या गावात मी गेलो त्यांनी माझा सत्कार केला. याचा एवढा राग शिंदे पिता पुत्राला आला. की रात्रभर पोलीस स्टेशनला त्याला बसवून ठेवलं.
मी त्याला जाऊन भेटलो. तो म्हणाला, तडीपार केलं तर करू दे, तू बिनधास्त रहा. राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन वातावरण गढूळ करायचं काम शिंदे पिता पुत्रांनी घेतल आहे ना ते कुठे तरी संपवायची वेळ आलेली आहे. अशा शब्दांत आमदार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली आहे.
संदीप माळी प्रतिक्रिया -
मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे. कोणाला घाबरणारा माणूस नाही. मला पोलीस ठाण्यात बोलावून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. लोकसभेमध्ये युती म्हणून आम्ही युतीधर्म पाळला आहे. कोणालाही दमदाटी केलेली नाही, त्रास दिलेला नाही. तरीसुद्धा फक्त राजू पाटील हे माझे मित्र आहेत. मैत्री केली तर किती त्रास झाला आहे पहा.
मी आगरी समाजाला आवाहन करतो तसेच भाजपाचे कल्याण ग्रामीणचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आवाहन करतो. आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या तुमच्यावर येऊ शकते. कारण लोकसभेमध्ये युतीधर्म पाळला त्याचे फळ मला मिळाले आहे. आता तरी जागे व्हा. लोकसभेत मनसेने आपल्याला मदत केली होती. राजू पाटील हे माझे जवळचे नातेवाईक देखील आहेत. त्यांना मदत केली असा संशय आल्याने मला तडीपार करण्यात आले आहे असे माळी यांनी सांगितले.
#ElectionWithSakal