लोहगाव - राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार. असा ठाम विश्वास केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. वडगावशेरी विधानसभेतील महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ लोहगाव येथील श्री. संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. मोहोळ यांनी मागील दहा वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली. याचबरोबर राज्यात १९५ पेक्षा अधिक जागांवर महायुती विजय संपादित करेल असे ते म्हणाले.
पुणे विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्याची प्रक्रिया जवळपास पुर्ण झाली असून लवकरचं त्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळेल. असे त्यांनी सांगितले. याचबरोबर विरोधक प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहेत, मात्र आपण नागरीकांची कामे केली असल्याने आपल्याला विरोधकांनी पसरवलेल्या अफवांचा फरक पडत नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान विरोधकांच्या टिकेला उत्तर देतांना महायुतीचे उमेदवार टिंगरे म्हणाले, माझ्या राजकीय जिवनाची सुरुवात लोहगावमधून झाली. त्यामुळेचं ७० टक्के निधी हा लोहगावमध्ये वापरला असून विरोधक फक्त राजकारण करत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेला लेखाजोखा मांडावा. तसेच तुम्ही पात्रता सोडली तर सुनील टिंगरेही तुम्हाला सोडणार नाही. असे ते विरोधकांना उद्देशून म्हणाले.
टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर स्पष्टिकरण देतांना टिंगरे म्हणाले, मी वैयक्तीक पवारसाहेबांना नोटीस पाठवली नसून महाविकासआघाडीतील पक्षांना नोटीस पाठवली आहे. याचबरोबर माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे सत्य तपासून पहावे. अशा आशयाची ती नोटीस असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार सुनील टिंगरे, पांडुरंग खेसे, निर्मला नवले, रोहिदास उंद्रे, अर्जुन गरुड, अशोक खांदवे, बंडु खांदवे, संतोष खांदवे, रावसाहेब राखपसरे सुशांत माने आदी उपस्थित होते.
आमदार टिंगरे आणि मोहोळ यांचेतील 'आण्णा' हे नाम साधर्म्य सांगत, 'एक आण्णा लोकसभेत गेला, एक आण्णा विधानसभेत चालला; आणि भाऊ रिकामा राहिला.' असा मिश्किल विनोद माजी आमदार मुळीक यांनी केला. त्यांच्या या विनोदावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
#ElectionWithSakal