विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवार म्हणाले…
Marathi November 15, 2024 10:24 AM

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष जमिनीवर जातीय ध्रुवीकरण होईल, असे मला वाटत नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात जातीय आधारावर मतदान झाल्यास बिगरमराठा मते महायुतीला (Mahayuti Allaince) मिळतील का, असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारधारेचा आहे, ही विचारसरणी महाराष्ट्रात घट्ट रुजली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये जी राजकीय समीकरणे प्रभावी ठरतात ती महाराष्ट्रात चालणार नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले. ते ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना भाजपने यापूर्वी यशस्वीपणे राबविलेल्या माधव (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युलाबाबत विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी म्हटले की,माधवं फॉर्म्युला हा त्यावेळी यशस्वी ठरला होता. तेव्हा भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे, ना.स. फरांदे आणि अण्णा डांगे यांच्यासारखे दिग्गज ओबीसी नेते होते. माधव फॉर्म्युलामुळे सर्वाधिक धुव्रीकरण हे वंजारी समाजात झाले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या एका आदेशावर निवडणुकीचा निकाल बदलायचा. परंतु, आता तसे घडताना दिसत नाही. कारण आता विशिष्ट समाजाचे मतदार एका मर्यादेपर्यंतच विशिष्ट नेत्यांना पाठिंबा देताना दिसतात. वंजारी समाजात आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने नवीन नेतृत्व दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही भाष्य केले. मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पराभूत करण्याच आवाहन केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क असतो. त्यामुळे जनताच काय तो निर्णय घेईल. महाराष्ट्राने आजपर्यंत जातीच्या आधारावर मतदान करणे टाळले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता फेटाळली

अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली. या निवडणुकीत महायुतीला 175 जागा मिळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला मतदारांनी पवारसाहेबांना प्राधान्य देऊन सुप्रिया सुळे विजयी केले. त्याप्रमाणे विधानसभेला बारामतीमध्ये माझा विजय होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादा म्हणाले, मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी फिरत आहेत का? आता शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.