लंडन - शैक्षणिक, सामाजिक आणि प्रसारमाध्यमांमधील अतुलनीय योगदानाबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना नुकतेच प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमारे ९२ वर्षांची समृद्ध सांस्कृतिक प्रतिष्ठित परंपरा असलेल्या लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे हा सन्मान करण्यात आला.
ब्रिटिश संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये (प्रतिनिधी गृह) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी खासदार जॉय मॉरिसे यांनी या उल्लेखनीय पुरस्कार प्रदानामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘प्रतापराव पवार यांनी भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील माध्यम उद्योगाला आकार देण्यासाठी परिवर्तनवादी भूमिका घेतली.
त्यांच्या समर्पित नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळेच ‘सकाळ माध्यम समूहा’ने भारतातील सर्वांत विश्वासार्ह आणि प्रभावशाली माध्यम अशी प्रतिष्ठा आणि मापदंड निर्माण केला आहे. माध्यम क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्रांतही त्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत या विद्यापीठाने तांत्रिक शिक्षण व इनोव्हेशनमध्ये मोठी भरारी घेतली. याशिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करणे आणि उद्योजकतेला चालना देण्याचे कार्य पवार यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत.
विविध क्षेत्रांतील त्यांच्या नेतृत्वाचा समाजावर कायमचा प्रभाव पडला असून, त्यातून सकारात्मक प्रेरणा मिळत असते. यामुळे महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.’
दरम्यान, पवार यांच्या सन्मानात आणखी भर घालत त्यांना मंडळाचे आजीव मानद सदस्यत्व प्रदान करत मंडळाच्या नवीन उपक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले. यावेळी प्रतापराव पवार म्हणाले, ‘आपण केलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञ आहे.
हा पुरस्कार ‘सकाळ’च्या आणि मी काम करीत असलेल्या विविध सामाजिक संस्थांमधील समरसून काम करण्याऱ्या टीमला समर्पित करतो. समाजाची सचोटीने आणि चांगल्या उद्देशाने सेवा करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा भाग होण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल मी कृतार्थ आहे.’
पवार यांच्या भाषणानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे प्रश्नोत्तरे झाली. उपस्थितांनी उभे राहून अभिवादन करत पवार यांच्या भाषणाचे स्वागत केले.
प्रतापराव पवार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचे भाग्य मिळाले याबद्दल आम्हाला विशेष आनंद होत आहे. माध्यम, शिक्षण आणि सामाजिक विकासात त्यांचे बहुआयामी योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्राचा वारसा जागतिक स्तरावर उमटवला आहे. त्यांचे कार्य नवीन पिढ्यांना प्रेरणा, प्रगती आणि जबाबदारीचा दृष्टिकोन देणारे आहे.
- वृषाल खांडके, अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, लंडन