मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. युती म्हणून एकत्र निवडणूक लढवलेल्या शिवसेनेनं भाजपची साथ सोडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. मात्र, तत्पूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय स्थित्यंतरे बदलल्याचं दिसून आलं. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. विशेष म्हणजे ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते. पण, शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात माझा कोणताही हात नव्हता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट लागल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. आता, फडणवीसांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतून पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गत निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्र असल्याचा दावा केला आहे. त्यावर, आता शरद पवारांनी जबरा पलटवार केला आहे. महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळे लागली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी एका मुलाखतीत सांगितले. याच अनुषंगाने शरद पवाराना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर शरद पवारांनी जबरा पलटवार केला. मी त्यांचा आभारी आहे, तेव्हा मी काही सत्तेत नव्हतो, माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही, तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते, याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे, माझं स्थान काय आहे.
गत 2019 च्या निवडणूक निकालानंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे 10 नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्यावेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. दरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, “राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं, असेही त्यांनी सांगितलं.