तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
शुभम बोडके November 15, 2024 05:13 PM

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Elections 2024) नाशिकमधील 348 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून (Nashik Police) तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. यात भाजप पदाधिकारी विक्रम नागरे (Vikram Nagare) यांच्या नावाचाही समावेश आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत विक्रम नागरे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाआधीच विक्रम नागरे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. मात्र नाशिक पोलिसांनी तडीपार केलेले विक्रम नागरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करण्यावर ठाम आहेत. 

विक्रम नागरे म्हणाले की, दहा ते पंधरा हजार कामगार आणि कार्यकर्त्यांसह मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. सीमा हिरे यांना उमेदवारी नको हा विरोध केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पंधरा वर्षात एकही गंभीर गुन्हा नसताना राजकीय सुडबुद्धीतून माझ्यावर कारवाई करण्यात आली. मी कोणता गुन्हा केला नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही, मी जुना शिवसैनिक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  तर आता तडीपार केलेले विक्रम नागरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सीमा हिरेंचा विक्रम नागरेंवर पलटवार

दरम्यान, भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. विक्रम नागरे यांनी सीमा हिरे यांना उमेदवारी नको हा विरोध केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली, असे म्हटले. याबाबत विचारले असता नाशिक पश्चिमच्या भाजपच्या उमेदवार सीमा हिरे म्हणाल्या की,भाजप अथवा माझा या प्रकरणी कोणताही सहभाग नाही. ज्यांनी जे कर्म केले आहेत त्याचे फळ मिळत राहते, असे म्हणत त्यांनी विक्रम नागरे यांच्यावर पलटवार केला. 

उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये तोफ धडाडणार

दरम्यान,  विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून नाशिकमध्ये बड्या नेत्यांच्या सभा पार पडत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिक येथे अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी सभा होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार हे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही सभा ठाकरे यांच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभेतून कोणावर तोफ डागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा

Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.