Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारणा करत चौकशी केलीय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा नव्याने निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याचे बघायला मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभेसाठी आले असताना आंबेडकरांना राहुल गांधीचा यांचा फोन आला आहे. यावेळी राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकर यांना चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देत स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडी झाल्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये दुरावा वाढला होता. अकोल्यात लोकसभेला काँग्रेसने आंबेडकरांविरोधात उमेदवार दिला होता. त्यामुळे लोकसभेत आंबेडकर पराभूत होत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात राहुल गांधींच्या फोननंतर वंचित आणि काँग्रेसमधील कटुता आता काही प्रमाणात कमी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
तुम्ही सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तरीही तुम्ही भाजपाला मतदान करत असाल तर तुम्हाला कोण वाचवेल? अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे. अशी टीका ही प्रकाश आंबेडकरांना बुलढाणा येथील सभेतून सरकारवर केली आहे.
सत्ताधारी आता सरळ पैसे वाटतील. प्रत्येक मताला चार हजार देतील. फक्त 80 हजार मत पाहिजे करा हिशोब. नंतर कमिशन घेऊन ते भरून काढतात. पाच टक्के तुम्हाला दिलं तरी पंधरा टक्के हे सत्ताधारी खातात. शेतमाल घेणारा मारवाडी का असतो? इथल्या बेरोजगारांना अनुदान का देत नाही. म्हणून तुमची प्रगती करायची असेल तर राज्यात बदल आवश्यक आहे. ते म्हणतात तुम्ही कितीही बोंबला. सत्ता आमच्याकडेच येईल. कारण ते सर्व आमचे जातीचे आहेत. त्यांना विकास नकोय. मी ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.