राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई November 15, 2024 06:13 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. पवारांचं राजकारण हे जातीयवादी असून त्यांनीच जातीय राजकारणाची सुरुवात केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचार करताना जाहीर सभांमधून ते महाविकास आघाडी व महायुती सरकावरही हल्लाबोल करत आहेत. मात्र, याचवेळी शरद पवारांना (Sharad pawar) लक्ष्य करत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या बारामतीमधील उद्योगधंद्यांवरुन व बारामतीमधील विकासावरूनही राज ठाकरेंनी त्यांना हिनवलं. शरद पवार हे केवळ तालुक्याचे नेते,कारण एका तालुक्यातच त्यांनी उद्योग व इंडस्ट्रीज उभारली. जो आपल्या तालुक्यात व्यवसाय, उद्योग आणतो तो तालुक्याचा नेता असतो, म्हणून शरद पवार हे तालुक्याचे नेते असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरेंना त्यांच्या खालच्या माळ्यावर कोण राहतं हे तरी माहिती का, असा बोचरा सवाल आव्हाड यांनी केला.  

राज ठाकरे यांच्या खालच्या माळ्यावर कोण राहतो ते तर त्यांना माहिती आहे का? अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवारांना तालुका लेवलचे नेते म्हटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी कधीही कोणता पक्ष फोडला नाही, त्यामुळे त्यांच्यावर हा आरोप लागू शकत नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात आज खुद्द अजित पवार सभा घेणार आहेत, त्याआधीच जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप महायुतीतील पक्षांवर केला आहे. प्रत्येक सोसायटीचा रेट ठरवला जात असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हटले. तसेच, अशाप्रकारचे राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

राज ठाकरेंच्या आरोपाला शरद पवारांचेही उत्तर

शरद पवारानी महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केल्याचा आरोप राज ठाकरे सातत्याने करत आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेतही राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना जातीय मुद्दा पुढे घेतला. त्यावरुन, शरद पवारांनीही कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जो आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.

पगडी हे जातीधर्माचं लक्षण नाही

पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना डोक्यावरील पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालायला लावली. हाच शरद पवार यांचा जातीयवाद आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, तो कार्यक्रम महात्मा फुले यांचा होता, त्यांच्या विचारांचा होता. त्या कार्यक्रमात मला स्वत:ला आणि इतर सगळ्यांना फुले पगडी घालण्यात आली. त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरुर बोललो की, माझ्या डोक्यावर फुले पगडी घातली याचा मला आनंद आहे. पगडी हे काही जातीधर्माचं लक्षण नाही. त्यामुळे फुले पगडी वापरा आणि त्याचा आनंद आहे, अशाप्रकारचं वाक्य बोललं तर लगेच आपण जातीयवादी होतो का?,असा सवालही शदर पवारांनी उपस्थित केला होता.  

मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.