Sharad Pawar In Chandgad : माझं भाग्य आहे की मला बाबासाहेब कुपेकर यांच्यासारखा मित्र मिळाला, पण दुःख आहे की तो मित्र आम्हाला लवकर सोडून गेला. संध्यादेवी यांची इच्छा नसताना आम्ही त्यांना आमदार केलं. आता बाबासाहेब त्यांच्याप्रमाणे वेगानं काम करणारे आणि इथल्या लोकांशी जुळवून घेणारे नेतृत्व नंदाताई यांच्याशिवाय दुसरे कुणी नाही आणि मला खात्री आहे आमची निवड 23 तारखेला योग्य ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंदगडमधील सभेत व्यक्त केला.
इथं निवडून आलेले माजी आमदार संध्यादेवी यांचा सन्मान करतील, जनतेची सेवा करतील असं वाटत होतं, पण राजेश पाटील आणि आणखी काही लोक आम्हाला फसवून सोडून गेले. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर नंदाताई यांना निवडून द्या, नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नंदाताईच्या पाठीशी उभा रहायचं, असे शरद पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान संविधान बद्दलण्याबाबत विधान करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांनी 400 पार नारा दिला होता, याचा अर्थ बाबासाहेबांची घटना दुरुस्त करण्याचा विचार असावा अशी आम्हाला शंका आली, पण तुम्ही लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला, आता विधानसभा निवडणूक आली आहे. एकाधिकारशाही मोडण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन आघाडी केली. 2 वर्षे सोडून 10 वर्षे सत्ता असताना भाजपला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाहीत. लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये देण्याला माझा विरोध नाही, पण 1500 रुपयांपेक्षा लाडक्या बहिणींना सुरक्षेची अधिक गरज आहे. दुर्दैवाने महिलांवरील अत्याचार सर्वात जास्त झाले आहेत. दोन वर्षात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. 64 हजार मुली बेपत्ता आहेत. राज्यात आमच्या मुलींची प्रतिष्ठा याच्या व्यतिरिक्त मोठं काही असू शकत नाही. मुलं शिकतात पण त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे तणावातून चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात.
पवार यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 62 लाख पेक्षा जास्त तरुण बेरोजगार आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी आलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हे प्रमुख कारण आहे. मोदी सरकारने उद्योगपती आणि व्यापाराचे कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. हे सरकार शेतकरी, महिला, तरुणांच्या हिताचे नाही. हे सरकार घालवण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल.
इतर महत्वाच्या बातम्या