बचतगट संघटनांचा शक्तिप्रदर्शनासाठी वापर
esakal November 15, 2024 10:45 PM

72107
बचतगट संघटनांचा शक्तिप्रदर्शनासाठी वापर

विधानसभेसाठी चढाओढ ः महिलांची एकी राजकारण्यांच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. जाहीर सभा, खळा बैठकांवर जोर दिला जात आहे. आपल्या सभेला बैठकांना किती गर्दी असते, हे दाखविण्याचाच प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो; मात्र हे करताना महिला बचतगटांच्या माध्यमातून संघटित शक्तीचा सऱ्हास वापर केला जात असल्याचे दिसते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता, या ठिकाणी महिला बचतगटांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. गावागावांमध्ये एक-दोन नव्हे, तर पाच-सहा बचतगट कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांची निर्मिती झाली असली तरी, आज ठराविक बचतगटांकडून त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. बहुतांशी बचतगट हे आजही ‘बे एके बे’ याच पद्धतीवर कार्यरत आहेत; मात्र बचतगटांच्या महिलांची एकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घट्ट असल्याचे दिसून येते. याच एकीचा वापर सध्या निवडणुकीच्या काळात पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते घरोघरी प्रचार करण्यासाठी महिला बचतगटांच्या संघटितपणाचे वापर केला जात आहे. बचतगटांच्या महिलांना एकत्रित करत बचतगटांसाठी आर्थिक अभिषेक दाखवून हे काम त्यांच्या हातून केले जात आहे. खळा बैठका, जाहीर सभा यांवर सध्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांचा जोर आहे. आपल्या सभांना महिलावर्ग तसेच जनतेची किती गर्दी आहे, हे दाखविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा, त्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी बचतगटांचा वापर होताना दिसून येत आहे.
---
महिला स्वावलंबनाचे काय?
आर्थिक प्रलोभनांना भुलून बचतगटांच्या महिलाही प्रामाणिकपणे उमेदवाराचे काम करताना दिसून येत आहेत. प्रचार सभांना या महिला तासनतास बसून आपले ‘कर्तव्य’ पार पाडत आहेत. एकूणच राजकारण्यांकडून महिला बचतगटांना स्वावलंबी न बनवता, त्यांच्या हाताला काम न देता त्यांचा केवळ राजकारणासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला जात आहे. याबाबत विरोधकांकडून एकमकांवर खळा बैठकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.