'आओ बच्चो मिलजूलकर हम बालदिन मनायेंगे'
esakal November 15, 2024 10:45 PM

25263

‘आओ बच्चो मिलजूलकर हम बालदिन मनायेंगे’

‘स्टेपिंग स्टोन’मध्ये गीताची धून ः पं. नेहरूंना अभिवादन, बालदिनी विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी ‘बालदिन’ साजरा करण्यात आला. मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती समाजाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा हा विशेष दिवस म्हणून बालदिन साजरा केला. यावेळी ‘आओ बच्चो मिलजूलकर हम बालदिन मनायेंगे’ हे गीत विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसमवेत पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांना नेहरूंविषयी माहिती देण्यात आली व बालदिन का व केव्हापासून साजरा केला जातो, याची माहिती दिली. सर्व शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी ‘आओ बच्चो मिलजूलकर हम बालदिन मनायेंगे’ हे गीत म्हटले. हे गीत प्रशालेच्या संगीत शिक्षक कपिल कांबळे यांचे स्वनिर्मित असून, या काव्याला संगीत संयोजन देऊन ते विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीतशिक्षक कांबळे यांनी चाचा नेहरू यांच्यासारखा वेश परिधान केला. विद्यार्थ्यांनीही रंगीबेरंगी वेश परिधान केले. पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांच्या ‘इंटरहाऊस कॉम्पेटिशन्स’ घेण्यात आल्या. यामध्ये पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांची ‘स्पेल बी’ ही स्पर्धा, दुसरीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा, चौथीसाठी ज्ञानेंद्रियांद्वारे वस्तूंची ओळख, पाचवीची गणित प्रश्नमंजुषा तर सहावीच्या विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. स्पर्धेनंतर सर्व शिक्षकांनी मिळून विविध पदार्थांचे स्टॉल घातले. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या पदार्थांच्या नावाचे बॅनर लावले गेले. वेगवेगळे चविष्ट पदार्थ स्टॉलमध्ये ठेवण्यात आले. प्रशालेत या खमंग पदार्थांचा सुवास पसरला होता. या बालमेळ्याचे संगीत शिक्षक कांबळे, मुख्याध्यापिका साळगावकर व शालेय समन्वयक सुषमा पालव यांनी लहान मुलांसमवेत उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या बालमेळ्याचा अनुभव उत्साहाने अनुभवला. विविध खेळांचाही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. सहायक शिक्षिका सुझैन शेख यांनी गुरुनानक यांच्याविषयी माहिती सांगितली. शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका साळगावकर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्तमरित्या सहभाग घेतल्यामुळे त्यांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.