Nashik West Assembly Constituency : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून महायुतीतून (Mahayuti) भाजपने (BJP) विद्यमान आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) दिनकर पाटील (Dinkar Patil) यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 2009 मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नाशिक शहरातील मतदारसंघांचे विभाजन होऊन नाशिक पश्चिम मतदारसंघ तयार झाला. पहिल्या विधानसभा निवडणुकीत येथे मनसेचा उमेदवार विजयी झाला होता. मनसेचे उमेदवार नितीन भोसले हे 2009 साली विजयी झाले होते. मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून येथे भाजपच्या सीमा हिरे यांचे वर्चस्व कायम आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अपूर्व प्रशांत यांचा सीमा हिरे यांनी 10 हजार मतांनी पराभव केला होता.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 3,82,131 मतदार आहेत. अनुसूचित जमातींची संख्या 55,065 आहे. तर अनुसूचित जमातीच्या लोकांची संख्या 21,094 आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 16,814 आहे. येथे राखीव प्रवर्गातील लोकसंख्या खूपच कमी आहे, मात्र येथील तरुण मतदानात महत्त्वाची भूमिका बजावतात. या मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे सीमा हिरे यांच्या समोरे तगडे आव्हान आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील या निवडणुकीतून रंगत वाढवली आहे. अलीकडेच दिनकर पाटील यांना मुस्लीम बांधवांनी पाठींबा दर्शवला आहे. मनसे पक्षाला नव्हे तर उमेदवाराला पाठींबा देत आहोत, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली आहे. आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे विजयाची हॅटट्रिक करणार? सुधाकर बडगुजर बाजी मारणार की दिनकर पाटील विजयी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या